मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी!

शिक्षण खात्याचा आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd July, 04:24 pm
मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी!

पर्वरी: गोव्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे आणि भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर उद्या शुक्रवार, ४ जुलै रोजी राज्यातील सर्व शाळांना (School) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण संचालकांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांसाठीही ही सुट्टी लागू आहे. मात्र, प्रशिक्षणासाठी नेमलेले शिक्षक (Teacher) उपस्थित राहणे आवश्यक आहे. दरम्यान, राज्यातील अंगणवाड्याही पावसामुळे शुक्रवारी बंद राहतील.

पावसामुळे झाडे पडून नुकसानीच्या घटनांची नोंद झाली. राज्यभरात काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून राहण्याच्या घटना घडल्या. पारोडा येथे कुशावती नदीला पूर आल्याने केपे - मडगाव मार्ग पाण्याखाली गेला. पावसामुळे चिंबल येथील एका घराची भिंत कोसळून पडली. हवामान खात्याने आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करत दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उद्या राज्यातील बालवाड्याही बंद राहणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास संचालनालयाकडून मिळाली.

राज्यात बुधवारी सकाळी ८.३० पर्यंत ६.३४ इंच पावसाची नोंद झाली. चोवीस तासात धारबांदोडामध्ये तब्बल ९.०३ इंच पाऊस पडला. राज्यातील १४ पैकी ११ केंद्रात ६ इंचांपेक्षा अधिक पावसाची नोंद. जुने गोवेमध्ये ७.३७ इंच, मडगावमध्ये ७.३२ इंच, म्हापसामध्ये ६.९३ इंच, सांगे मध्ये ६.८४ इंच, फोंडामध्ये ६.६५ इंच तर पणजीत ६.०८ इंच पावसाची नोंद झाली. राज्यात १ जून ते ३ जुलै पर्यंत सरासरी ४० इंच पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात १ जूनपासूनचा सर्वाधिक पावसाची नोंद (१६१ मिमी) झाली आहे. 

हेही वाचा