रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या ‘रामायण’ या बहुप्रतिक्षित पौराणिक महाकाव्याधारित चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला असून त्याने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. पोस्टर आणि टीझरमध्ये दिसणारी भव्य दृश्ये, अभिनयाची झलक आणि पार्श्वसंगीत प्रेक्षकांमध्ये थरार निर्माण करत आहेत.
रणबीर कपूर : प्रभू श्रीराम : त्यांच्या पहिल्या लूकमध्ये सूर्य आणि ढगांच्या पार्श्वभूमीतील शांत, तेजस्वी श्रीराम बाण साधत रावणाकडे रोखताना दिसतात.
साई पल्लवी : सीता माता : एका सौम्य, अध्यात्मिक तेजाने झळकणारी साई पल्लवी प्रभू रामांच्या पत्नीची भूमिका साकारत आहेत.
यश : रावण : दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा रावणाचा लूक आणि करिष्मा हे या चित्रपटातील विशेष आकर्षण आहे. यशने स्वतः एका मुलाखतीत विचारले होते की, "रामायणातील कोणतीही भूमिका तू स्वीकारली असती, तर त्याने सांगितले होते, रावणाची भूमिका मला सर्वात अधिक आकर्षित करते.
सनी देओल : हनुमान : सनी देओल हनुमानाच्या भूमिकेसाठी योग्य निवड मानली जात आहे. रवी दुबे : लक्ष्मण, रकुल प्रीत सिंह : शूर्पणखा, काजल अग्रवाल : मंदोदरी, लारा दत्ता : कैकेयी अशी दिग्गज कलाकारांची फौज पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून निर्मिती नमित मल्होत्रा यांची आहे. चित्रपटाचे बजेट ५०० ते ६०० कोटी आहे. चित्रपटाचा पहिला भाग २०२६ तर, दुसरा भाग २०२७ मध्ये झळकणार आहे.
मोशन पोस्टरमध्ये ज्या प्रकारे राम आणि रावण यांच्यातील संघर्षाचे प्रतीकात्मक दृश्य दाखवले आहे, ते पाहून प्रेक्षक अक्षरशः रोमांचित झाले आहेत.
नमित मल्होत्रा यांनी पोस्टर शेअर करताना लिहिले, दहा वर्षांची प्रतीक्षा. आतापर्यंत लिहिलेले सर्वात मोठे महाकाव्य जगासमोर आणण्याचा दृढनिश्चय. जगातील काही सर्वोत्तम लोकांसोबत सहकार्य करून अत्यंत अभिमानाने ‘रामायण’ सादर करीत आहोत.
भव्य स्टारकास्ट, प्रचंड बजेट, अचूक साजेसं संगीत आणि भव्य व्हिज्युअल्समुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या आहेत. खास करून रणबीर, यश आणि साई पल्लवीची ताडमांडणारी भूमिका पाहण्यासाठी सर्वजण आतुर झाले आहेत.
राम आणि रावण यांच्यातील चिरंतन संघर्ष, प्रेम आणि धर्माची अमर गाथा या भव्य चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्या पिढीसमोर सादर होत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरण्याची शक्यता असलेल्या ‘रामायण’ चित्रपटासाठी आता उलटी गिनती सुरू झाली आहे.