कर्णधार शुभमन गिलचा द्विशतकी धमाका

भारताच्या पहिल्या डावात ५८७ धावा : दिवसअखेर इंग्लंड ३ बाद ७७

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
10 hours ago
कर्णधार शुभमन गिलचा द्विशतकी धमाका

एजबेस्टन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने भक्कम पकड मिळवली आहे. भारताने कर्णधार शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर पहिल्या डावात ५८७ धावा केल्या. इंग्लंडची सुरुवात खराब झाली असून दिवसअखेर ३ गड्यांवर ७७ धावा अशी त्यांची स्थिती आहे.
दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ५८७ धावांवर संपला आणि इंग्लंडचे तीन बळी घेत भारताने चांगली सुरुवात केली. तथापि, हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी चौथ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी करून इंग्लंडची धुरा सांभाळली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात तीन विकेट गमावून ७७ धावा केल्या आहेत आणि अजूनही भारतापेक्षा ५१० धावांनी पिछाडीवर आहे. खेळ थांबला तेव्हा ब्रूक ३० धावांसह आणि रूट १८ धावांसह खेळत होते.
जसप्रीत बुमराहशिवाय खेळण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला आकाश दीपने दुहेरी यश दिले. त्याने सलग दोन चेंडूंवर दोन विकेट घेत इंग्लंडला सुरुवातीचा धक्का दिला. आकाशने प्रथम शुभमन गिलच्या गोलंदाजीवर बेन डकेटला झेल देऊन बाद केले आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर ऑली पोपला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डकेट आणि पोप खाते न उघडता बाद झाले. यानंतर मोहम्मद सिराजने जॅक क्रॉलीला बाद करून इंग्लंडला तिसरा धक्का दिला. क्रॉलीने ३० चेंडूत तीन चौकारांसह १९ धावा केल्या.
या सामन्यात भारतीय कर्णधार शुबमन गिलने इतिहास रचला. सामन्यातील दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना गिलने दमदार द्विशतकी खेळी केली. यासह त्याने भारती संघाला पहिल्या डावात ५८७ धावांपर्यंत पोहोचवले आहे. दरम्यान गिलने भारतीय संघाकडून सर्वात मोठी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अनेक दिग्गज खेळाडूंना मागे सोडले आहे.
शुबमन गिल हा परदेशात (दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड) सर्वांत मोठी खेळी करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. याची मोठ्या रेकॉर्डमध्ये त्याने सुनील गावसकर, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे सोडले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २००४ मध्ये सिडनिच्या मैदानावर २४१ धावांची खेळी केली होती. याआधी राहुल द्रविडने ॲडीलेडच्या मैदानावर २३३ धावांची खेळी केली होती. तर सुनील गावसकर यांनी १९७९ मध्ये ओव्हलच्या मैदानावर २२१ धावांची खेळी केली होती. गिलने या डावातील २४२ वी धाव घेताच या दिग्गज खेळाडूंचा रेकॉर्ड मोडून काढला.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड हा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहलीने २०१९ मध्ये पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात २५४ धावांची खेळी केली होती. २५५ धावांचा पल्ला गाठताच गिलने विराटचा हा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. आता गिल हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. या यादीत विराट कोहली तिसऱ्या स्थानी आहे. विराटने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात २४३ धावांची दमदार खेळी केली होती.
भारताचा कर्णधार शुबमन गिल हा सेना देशात (इंग्लंड, दक्षिण आफ्रिका,ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड) द्विशतकी खेळी करणारा आशियातील पहिलाच कर्णधार ठरला आहे. याआधी आशियातील कुठल्याही कर्णधाराला परदेशात फलंदाजी करताना द्विशतकी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे गिलने बर्मिंघममघ्ये इतिहासाला गवसणी घातली आहे.यासह शुबमन गिलच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. शुबमन गिल हा इंग्लंडमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी कुठल्याही भारतीय कर्णधाराला इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळताना २०० धावांचा पल्ला गाठता आलेला नाही. याआधी हा रेकॉर्ड भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांच्या नावावर होता. मोहम्मद अझरूद्दीन यांनी १९९० मध्ये ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर फलंदाजी करताना १७९ धावांची खेळी केली होती. त्यावेळी हा रेकॉर्ड करणारे ते पहिलेच भारतीय कर्णधार ठरले होते. आता गिलने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. १८० धावांचा पल्ला गाठताच गिल हा इंग्लंडमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे.
शुभमन वगळता भारतासाठी यशस्वी जैस्वाल ( ८७), रवींद्र जडेजा ( ८९), वॉशिंग्टन सुंदर (४२) व करुण नायर (३१) यांनी उपयुक्त खेळी केली. यशस्वी व करुण नायर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८० (९० चेंडू) धावांची भागीदारी करून भारताची गाडी रुळावर आणली. त्यानंतर शुभमन व यशस्वी यांनी ६६ (१३१) , रिषभ पंत व शुभमन ४७ (९०) यांच्या भागीदारीने संघाला मजबूत स्थितीत आणले. रवींद्र जडेजा व शुभन यांच्या २७९ चेंडूंत २०३ धावांच्या विक्रमी भागीदारीने इंग्लंडचे खच्चीकरण केले. प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या वॉशिंग्टन सुंदरनेही १८९ चेंडूंत १४४ धावा शुभमनसह जोडल्या. या पाच भागीदारीने भारताला सामन्यात फ्रंटसीटवर बसवले.
रवींद्र जडेजाचा विश्वविक्रम
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे चौथे चक्र सुरू आहे. टीम इंडियाची ही २०२५-२७ च्या चक्रातील पहिलीच मालिका आहे. रवींद्र जडेजाने या स्पर्धेत आता २००० धावा पूर्ण केल्या आहेत. रवींद्र जडेजाने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ४१ कसोटी सामने खेळले आहेत आणि २०१० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने तीन शतके आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत. रवींद्र जडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये २००० धावांचा टप्पा गाठला आणि १०० विकेट्सही घेतल्या आहेत. आता तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात २००० धावा करणारा आणि १०० विकेट्स घेणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.
‘सेना’ देशात मोठी खेळी करणारे भारतीय
शुबमन गिल – २६९ धावा
सचिन तेंडुलकर – २४१ धावा
राहुल द्रविड – २३३ धावा
सुनील गावसकर – २२१ धावा
सर्वात मोठी खेळी करणारे भारतीय कर्णधार
शुबमन गिल – २६९ धावा
विराट कोहली – २५४ धावा
विराट कोहली – २४३ धावा
‘सेना’ देशात मोठी खेळी करणारे आशियाई कर्णधार
शुबमन गिल – २०० धावा, बर्मिंघम, २०२५
तिलकरत्ने दिलशान- १९३ धावा, लॉर्ड्स, २०११
मोहम्मद अझरूद्दीन- १९२ धावा, ऑकलँड, १९९०
हनिफ मोहम्मद – १८७ धावा, लॉर्ड्स, १९६७
मोहम्मद अझरूद्दीन- १७९ धावा, मँचेस्टर, १९९०