मडगाव : वार्का येथील बेकायदेशीर बांधकाम ग्रामस्थांनी पाडले बंद

'सीआरझेड' आणि रहिवासी जागेवर व्यावसायिक प्रकल्पाचे काम सुरू असल्याचा आरोप

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
15th September, 04:50 pm
मडगाव : वार्का येथील बेकायदेशीर बांधकाम ग्रामस्थांनी पाडले बंद

मडगाव: वार्का-बाणावली येथे सुरू असलेल्या एका व्यावसायिक प्रकल्पाचे काम स्थानिक ग्रामस्थांनी आज थांबवले. रहिवासी वापरासाठी दिलेल्या सनदेवर व्यावसायिक प्रकल्पाला मान्यता दिल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांनी या कामाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकरणी लवकरच 'काम बंद' नोटीस बजावली जाईल आणि कायदेशीर सल्ला घेतला जाईल, अशी माहिती सरपंच फ्लाविया बार्रेटो यांनी दिली.

यापूर्वीही ग्रामस्थांनी या प्रकल्पाबाबत पंचायत, नगरनियोजन खाते आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या, तरीही नगरनियोजन खात्याकडून (TCP) मिळालेल्या परवानगीनुसार कामाला सुरुवात करण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी घटनास्थळी जाऊन जेसीबीने झाडे तोडण्याचे काम रोखले.

यावेळी स्थानिक रहिवासी सोहेल फुर्तादो यांनी आरोप केला की, हा प्रकल्प 'सीआरझेड'  क्षेत्रातील जमिनीत उभारला जात आहे. तसेच, या जागेची सनद रहिवासी वापरासाठी असताना, नगरनियोजन खात्याने व्यावसायिक बांधकामाला परवानगी दिली आहे. याशिवाय, जागेत दोघांच्या मालमत्ता असून एकाच सर्व्हे क्रमांकावर परवानगी घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

पंचायत कायदेशीर सल्ला घेणार

याबाबत बोलताना पंच सेलू फर्नांडिस यांनी सांगितले की, या जागेवरील कामाला आधीच्या पंचायत मंडळाने परवानगी दिली होती आणि गेल्या वर्षी केवळ त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. लोकांचा विरोध असल्याने त्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास परवानगी मागे घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरपंच फ्लाविया बार्रेटो यांनी सांगितले की, रहिवासी वॉरन आलेमाव यांच्या तक्रारीनुसार ९ सप्टेंबरच्या पंचायत बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती. त्यानुसार आता कायदेशीर सल्ला घेतला जाईल आणि नगरनियोजन खात्याकडे पत्रव्यवहार केला जाईल. काहीजण फक्त समाजमाध्यमांवर सक्रिय असून त्यांनी कोणतीही अधिकृत तक्रार केलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले.