जास्त परताव्याच्या आमिषाने दोघा ज्येष्ठांना गंडा

सायबर विभागाकडून तपास : भामट्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून गुंतवणुकीचे दाखविले आमिष

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th September, 11:59 pm
जास्त परताव्याच्या आमिषाने दोघा ज्येष्ठांना गंडा

पणजी : व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवून दोघा ज्येष्ठ नागरिकांना १.५८ कोटी रुपयांच्या गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तिसवाडी तालुक्यातील दोनापावला येथील ७७ वर्षीय नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, १० सप्टेंबरपूर्वी अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी ८४२३३८०५१२ या मोबाईल व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तक्रारदाराला ‘आयआयएफएल-एचएनडब्ल्यू इन्व्हेस्टर्स ग्रुप’ या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर त्या ग्रुप मधील व्यक्तीने https://ietrrtpy.com या संकेतस्थळावरून त्यांनी गुंतवणूक करून मोठी रक्कम कमावल्याचे सांगितले. त्यानुसार, तक्रारदाराने वरील संकेतस्थळावर आपले खाते उघडले. त्यानंतर तक्रारदाराला वरील संकेतस्थळावर गुंतवणूक करून ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, तक्रारदाराने १ कोटी २८ लाख ४० हजार रुपये जमा केले. त्यानंतर त्याने वरील रक्कम काढण्यासाठी संबंधिताकडे संपर्क साधला असता, त्याचा संकेतस्थळावरील खाते बंद करण्यात आले. त्यानंतर त्याला शुल्कच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम जमा करण्यास सांगितले. संशय आल्यामुळे तक्रारदाराने चौकशी केली असता, ते बनावट असल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर विभागात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
दुसरी तक्रार सासष्टी तालुक्यातील राय येथील ७० वर्षीय नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार,१३ आॅगस्ट आणि २५ आॅगस्ट रोजी कीर्तन मेहता नामक व्यक्तीने त्यांच्याशी ८९०५१७६८३९, अंकिता घोष हिने ८४०१६४६७८२, ९१५९६६३१२९, ९७८९२६७०२३ आणि अादित्य शर्मा या व्यक्तीने ८४२८६६२९७२ या क्रमांकावरून तक्रारदाराला फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क केला. त्यानंतर तक्रारदाराला क्यू २७ बॉबकॅप्स ग्रुप या शेअर ट्रेडिंग ग्रुपमध्ये सहभाग करून घेतला. त्यानंतर तक्रारदाराला वेगवेगळ्या शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यास दररोज जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, तक्रारदाराने ३० लाख २० हजार रुपये जमा केले. त्यानंतर संशयिताला त्याला बनावट शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याचे भासवले. याच दरम्यान तक्रारदाराला संशय आल्यानंतर त्याने सायबर विभागात तक्रार दाखल केली.
अज्ञातांविरोधात गु्न्हा
दोन्ही तक्रारीची दखल घेऊन सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक अनुष्का पैबीर यांनी अज्ञात हॉट्सअॅप मोबाईलधारकांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ (२) आरडब्ल्यू ३(५) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ डी अंतर्गत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.