मडगाव : नोव्हेंबर अखेरपर्यंत गोव्यातील रस्त्यांची कामे पूर्ण होतील: मंत्री दिगंबर कामत

म्हणाले - विनापरवानगी रस्ते खोदणाऱ्यांवर दाखल करणार फौजदारी गुन्हे

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
मडगाव : नोव्हेंबर अखेरपर्यंत गोव्यातील रस्त्यांची कामे पूर्ण होतील: मंत्री दिगंबर कामत

मडगाव: राज्यातील रस्त्यांची डागडुजीची कामे नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी दिली आहे. तसेच, रस्ता खोदकामासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी असली तरीही, प्रधान मुख्य अभियंत्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. या निर्देशांचे पालन न झाल्यास संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री दिगंबर कामत यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात लोकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर बोलताना मंत्री कामत म्हणाले की, लोकांची कामे वेळेत होणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या काळात आवश्यक त्या ठिकाणी तत्काळ कामे हाती घेतली होती. मंत्रिपदाचा ताबा घेतल्यानंतर आपण वास्को, दाबोळी, पर्वरी यासह इतर ठिकाणी रस्त्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना करत डागडुजीची कामे हाती घेण्यास सांगितले आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातील रस्त्यांची कामे पूर्ण होतील, असा विश्वास मंत्री कामत यांनी व्यक्त केला.

इतर महत्त्वाचे निर्णय

रस्ता खोदकामासाठी प्रधान मुख्य अभियंत्याची परवानगी आवश्यक असतानाही, विनापरवानगी कामे करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्ता खोदकामासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी असली तरीही प्रधान मुख्य अभियंत्यांची परवानगीही आवश्यक आहे. या निर्देशांचे पालन न करता रस्ता खोदकाम करण्यात आल्यास संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिलेले आहेत, असे मंत्री कामत यांनी सांगितले.

मडगाव कदंब बस स्थानकाच्या समोरील 'जीसुडा'च्या जागेत दुचाकी लावल्या जातात, पण त्यातून कोणताही महसूल मिळत नाही. त्यामुळे 'जीसुडा'ला पे पार्किंग संदर्भात निविदा जारी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, ५ नोव्हेंबरपर्यंत निविदा काढण्यात येतील, असे 'जीसुडा'कडून सांगण्यात आले आहे. 'माझे घर' योजनेची मडगाव येथे अजून सुरुवात झालेली नाही. दिवाळीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या वेळेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करून योजनेचा शुभारंभ करण्यात येईल. तसेच, पंतप्रधान मोदी यांच्या पर्तगळी मठातील भेटीबाबत आवश्यक त्या सुविधा बांधकाम खात्याकडून केल्या जातील.

पेड्डा मडगावातील फूलविक्रेते किंवा रस्त्याशेजारी भाजी विक्री करणाऱ्या महिलांना नवी जागा उपलब्ध होईपर्यंत येथून न हटवण्याचे पालिकेला निर्देश दिलेत. फळ-फूल विक्रेते रस्त्यावर बसल्याने लोकांना त्याचा त्रास होत असल्याने पालिकेकडून त्यांना हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जुन्या बस स्थानकाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, त्यानुसार नियोजनबद्ध विकास केला जाईल, असेही मंत्री कामत यांनी स्पष्ट केले.