पत्रकारांनी राज्याची प्रतिमा कायम राखण्यासाठी काम करावे : मुख्यमंत्री डॉ. सावंत

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
4 hours ago
पत्रकारांनी राज्याची प्रतिमा कायम राखण्यासाठी काम करावे : मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी: पत्रकारांनी राज्य सरकारच्या चुकीच्या गोष्टींवर नक्कीच लेखन करावे. मात्र, गोवा राज्याची प्रतिमा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. पत्रकारांसह सर्वांनीच राज्याची प्रतिमा कायम राखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आज सोमवारी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माहिती आणि प्रसारण खात्याचे संचालक दीपक बांदेकर, सचिव एस. एस. गिल, राजतिलक नाईक आदी उपस्थित होते.



मुख्यमंत्री म्हणाले की, माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत आणि हा स्तंभ मजबूत करण्याचे काम पत्रकारांचे आहे. सध्या सत्य समाजासमोर आणणे ही काळाची गरज आहे. सत्य समोर आले नाही, तर खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते. "मला स्वतःला यामुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे," असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे माध्यमांनी सत्यासाठी काम करणे अपेक्षित आहे. माध्यमांनी बातमी देताना खरे काय, खोटे काय हे पडताळून मग द्यावी. पत्रकारांनी दोन्ही बाजू तपासून बातमी करावी. सरकारच्या चुकीच्या गोष्टींवर लिहिणे हा पत्रकारांचा अधिकारच आहे.



पत्रकारांसाठी विविध योजना

ते म्हणाले, मागील सहा वर्षांत राज्य सरकारने पत्रकारांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. ईव्ही (EV) बाईक योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय लॅपटॉपकॅमेरा योजना देखील सुरू आहे. निवृत्ती वेतन योजनेत देखील वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत. डिजिटल माध्यमांच्या नोंदणी प्रक्रियेबद्दल पत्रकार संघटनांनी माहिती आणि प्रसारण खात्याला सूचना कराव्यात. सरकार सदैव पत्रकार संघटनांसोबत राहील. महिला आधारित विकास ही देखील सध्याच्या काळाची गरज आहे.

पत्रकारांचा सन्मान

तत्पूर्वी, कार्टूनिस्टलेक्स फर्नांडिस यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, जॉयल आफोन्सो, नंदेश कांबळी, अतुल पंडित, बबन भगत, जय नाईक (वरिष्ठ पत्रकार) यांचा देखील सन्मान करण्यात आला. समीप नार्वेकर, अजय बुवा, रणदीप कौर, विभा वर्मा, मार्कुस मोर्गुल्याव, गौरी मळकर्नेकर, राजतिलक नाईक, ख्रिस्टिन माचाडो आणि पांडुरंग गावकर यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.


हेही वाचा