माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाललाही फाशीची शिक्षा : बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने सुनावली शिक्षा

ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान (Former Prime Minister) शेख हसीना (Sheikh Hasina) यांना मोठा झटका बसला आहे. पंतप्रधान हसीना व माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल यांना बांगलादेशच्या (Bangladesh) आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने (International Crimes Tribunal) फाशीची शिक्षा सुनावली आहे.
२०२४ साली हिंसाचार माजवल्याप्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, बांगलादेशला परतण्याचे मार्ग धुसर बनले आहेत.
गेल्या ऑगस्ट महिन्यात शेख हसीना सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व त्यात मोठा हिंसाचार झाला होता.
हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी शेख हसीना यांनी निशस्त्र लोकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्या दोषी ठरल्या असून, न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
शेख हसीना व त्यांच्याबरोबर माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल या दोघांनाही १२ लोकांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे व त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणातील तिसरे आरोपी तथा सरकारी साक्षीदार बनलेले माजी पोलीस महानिरीक्षक अब्दुल्ला अल मनून यांना पाच वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
कोर्टाने हसीना व असदुज्जमां खान कमाल यांची सर्व संपत्तीही जप्त केली आहे. शेख हसीना व असदुज्जमां दोघेही बांगलादेशातून फरार झाले आहेत. गेले १५ महिने भारतात आश्रयास आहेत.
तीन आरोपात दोषी
शेख हसीना भारतात असताना महिनाभर हा खटला चालला. त्यांच्यावर एकूण पाच आरोप ठेवण्यात आले होते. त्यातील तीन आरोपांत त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
आंदोलकांना ठार मारण्याचा आदेश देणे, हिंसाचाराला चालना देणे, विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनादरम्यान उसळलेला हिंसाचार व अत्याचाराला आळा घालण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत त्रीसदस्यीय न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले.
आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी व मारण्यासाठी जीवघेणी शस्त्रे, ड्रोन, व हेलिकॉप्टर यांचा वापर करण्याचा आदेश हसीना यांनी दिल्याचे न्यायालयाने म्हटले आहे न्यायालयाने हसीया यांची एक ऑडियो क्लिपही दाखवली. त्यात हसीना पोलिसांना लोकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.