सुकाणू समितीच्या बैठकीत प्रचारावर सविस्तर चर्चा; आचारसंहिता लागू होताच उमेदवारांची घोषणा

पणजी: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रचार हा प्रामुख्याने 'माझे घर' योजना आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांवर केंद्रित असेल. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच भाजप उमेदवारांची घोषणा करेल. पक्षाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत जिल्हा पंचायत निवडणुकीचा प्रचार आणि रणनितीवर सविस्तर चर्चा झाली. राज्यात १३ डिसेंबर रोजी जिल्हा पंचायत निवडणूक होणार आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
सुकाणू समितीची बैठक
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुकाणू समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, चंद्रकांत कवळेकर, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, खासदार सदानंद शेट तानावडे, क्रीडा मंत्री रमेश तवडकर, माजी खासदार विनय तेंडुलकर आणि सिद्धार्थ कुंकळ्येकार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
प्रचार संपूर्ण राज्यात
सुकाणू समितीचे सदस्य सिद्धार्थ कुंकळ्येकार यांनी माहिती दिली की, जिल्हा पंचायतीची आचारसंहिता लागू होताच पक्षाचे उमेदवार जाहीर केले जातील. प्रचार आणि रणनितीवर बैठकीत सखोल चर्चा झाली. पक्षाचे मंत्री, आमदार आणि पदाधिकारी संपूर्ण राज्यात जोरदार प्रचार करतील. 'माझे घर' यासारख्या योजनांच्या माध्यमातून सरकारने सामान्य जनतेसाठी केलेल्या विकासकामांचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यावर भाजपचा भर असेल.