टाईब्रेकमध्ये अर्जुन एरिगेसीच्या पराभवाने भारताच्या आशा संपुष्टात

फिडे विश्व कप २०२५ : चीनच्या जीएम वेई यी याच्याकडून पराभूत

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
10 hours ago
टाईब्रेकमध्ये अर्जुन एरिगेसीच्या पराभवाने भारताच्या आशा संपुष्टात

पणजी : भारताचा शेवटचा प्रतिनिधी असलेला ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी क्वार्टर फायनलच्या टाईब्रेकमध्ये चीनच्या जीएम वेई यी याच्याकडून पराभूत झाला आणि यामुळे भारताची विश्वकपमधील मोहिम संपुष्टात आली.
क्वार्टर फायनलमधील दोन्ही क्लासिकल सामने ड्रॉ झाल्याने निकाल टाईब्रेकवर आला. अरुणने पहिले टाईब्रेक गेम ब्लॅक पीसेजने फ्रेंच डिफेन्समध्ये सुरुवात केली. मिडलगेममध्ये अर्जुन दबावाखाली दिसत होते. वेई यीने २७ व्या चालीत बचावात्मक वाट निवडल्याने अर्जुनने चांगली पुनरागमनाची संधी मिळवली. तगडा लढा देत हा सामना ६६ चालींनंतर ड्रॉ झाला. दुसऱ्या गेममध्ये अर्जुनने व्हाईट पीसेजने वेईच्या पेट्रोव डिफेन्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वेई यीने २८ व्या चालीपासून पुढाकार घेतला. अर्जुनने शेवटपर्यंत झुंज दिली, पण वेईने आपल्या ‘सी’ प्याद्याचे क्वीनमध्ये प्रमोशन करून सामना आपल्या बाजूने वळवला. ७९ चालींनंतर अर्जुनने रेसिग्नेशन देत सामना गमावला. २०२३ मध्येही अर्जुन याच टप्प्यात (क्वार्टर फायनल टाईब्रेक) प्रज्ञानानंदकडून पराभूत झाला होता.
वेई म्हणाला, मी आनंदी आहे कारण अर्जुनसारख्या मजबूत तयारी असणाऱ्या खेळाडूविरुद्ध विजय मिळवणे कठीण असते. पहिल्या गेममध्ये माझ्याकडे बऱ्याच संधी होत्या, पण मी त्यांचा फायदा घेतला नाही. दुसऱ्या गेममध्ये त्याने जिंकण्यासाठी धोकादायक चाली खेळल्या आणि मला त्या क्षणी संधी दिसली.
एसिपेंको, सिंदारोवची दमदार कामगिरी
जीएम आंद्रेई एसिपेंकोने अमेरिकेच्या सॅम शँकलैंड याला दुसऱ्या सेटमध्ये दोनही गेम जिंकत पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये दोघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला. या विजयामुळे एसिपेंको सेमीफायनलमध्ये वेई यी याच्याशी भिडणार आहेत. जीएम जावोखिर सिंदारोव याने पेरूच्या मार्टिनेज अलकांतारा होसे एडुआर्डो यांना दुसऱ्या सेटच्या टाईब्रेकमध्ये हरवून सेमीफायनलचे तिकीट मिळवले.