मोपावर २३ रोजी ओमानचे विमान पोचले उशिरा

पणजी : इथिओपियात (Ethiopia) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे (Volcano Eruption) निर्माण झालेली विषारी राख प्रमुख शहरातील हवेत पसरल्यास गोव्यातील (Goa) विमान (Flight) सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हवेतील राखेमुळे २३ नोव्हेंबर रोजी ओमानमधील एक विमान अर्धा तास उशीरा पोचले होते, अशी माहिती मोपा विमानतळाचे (Mopa Airport) जनसंपर्क अधिकारी विक्रमसिंग तन्वेर यांनी दिली.
दाबोळी विमानतळाच्या विमान सेवेवर मात्र अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती विमानतळ संचालक धनंजय राव यांनी दिली.
विमानतळ परिसरातील हवेत राख असेल तर विमानाला उड्डाण करणे शक्य होत नाही. राख दूर होईपर्यंत उड्डाण थांबवावे लागते.
मोपा विमानतळावर येणाऱ्या विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला तर मोपावर विमान उशीराच पोचणार अशी माहिती विक्रमसिंग तन्वेर यांनी दिली.
आतापर्यंत तरी हवेतील राखेमुळे मोपाच्या विमानसेवेवर परिणाम झालेला नाही, असे ते म्हणाले.
दाबोळी विमानतळावर सर्व विमाने नियोजित वेळीच पोचलेली आहेत. विमानसेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही.
हवेतील राख कुठपर्यंत पोचेल, यावर सर्व अवलंबून असल्याचे दाबोळी विमानतळाचे संचालक धनंजय राव म्हणाले.
अनेक राज्यांत राख पसरण्याची शक्यता
दरम्यान, इथिओपियात हॅले गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निमार्ण झालेले राखेचे ढग भारताच्या दिशेने सरकत आहेत.
आज संध्याकाळी हे ढग गुजरात तर त्यानंतर राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, पंजाबपर्यंत पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे विमान सेवेवर परिणाम होत आहे. भारतातील अनेक विमान कंपन्यांनी विमान उड्डाणे रद्द केली आहेत.