गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्धापन दिनानिमित्त 'सार्ध पंचशतमहोत्सव'

पंतप्रधानांच्या हस्ते २८ नोव्हेंबर रोजी होणार दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या प्रभू श्री रामांच्या पुतळ्याचे अनावरण

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्धापन दिनानिमित्त 'सार्ध पंचशतमहोत्सव'

पणजी: श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्षपूर्तीनिमित्त (सार्ध पंचशतमहोत्सव) २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या रामाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल, अशी माहिती मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी दिली. बुधवारी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, अनिल पै, प्रवास नाईक आणि शिवानंद साळगावकर उपस्थित होते.

श्रीनिवास धेंपो यांनी सांगितले की, रामाचा हा पुतळा ७७ फूट उंच ब्राँझ धातूचा असून, तो तमिळनाडू येथील शिल्पकाराने बनवला आहे. अनावरण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी देवदर्शन करतील. त्यानंतर येथे सभेचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी १२ हजार लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यामध्ये टपाल खात्यातर्फे काढण्यात आलेल्या विशेष तिकिटाचे व अर्थ खात्यातर्फे काढण्यात आलेल्या विशेष नाण्याचेदेखील अनावरण होईल.

याशिवाय, २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत दररोज साधारणपणे १० हजार व्यक्ती भेट देतील, अशी आमची अपेक्षा आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिकांसह देशभरातील नावाजलेले कलाकार आपली कला सादर करतील. यामध्ये अनूप जलोटा, शंकर महादेवन, अमृता शेनॉय, महेश काळे आदींचा समावेश आहे. गोमंतकीय भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन धेंपो यांनी केले.

यावेळी बोलताना मंत्री दिगंबर कामत म्हणाले की, मठ ५५० वर्षे पूर्ण करत आहे, ही खूप महत्त्वाची घटना आहे. हा मठ समस्त गोमंतकीयांचा अभिमान आहे. या महोत्सवाचा एक भाग म्हणून ५५० कोटी राम नाम जप जपण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. याला गोव्यासह देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच येथे दहा दिवसांत ५५० हवन केले जाणार आहेत. केंद्र सरकार पर्यटनाला चालना देत आहे, त्यामुळे पर्यटकांनीही पर्तगाळी मठाचा अनुभव घ्यावा.

लवकरच रामायण थीम पार्क

मठ परिसरात पुढील दोन महिन्यांत रामायणावर आधारित थीम पार्क, १० हजार चौरस मीटर जागेत म्युझियम, तसेच प्रकाश आणि ध्वनी शो आदी सुरू केले जाणार आहेत. यामुळे हा मठ लवकरच पर्यटनाचेही मोठे आकर्षण बनेल.

हेही वाचा