किनारपट्टी पोलिसांच्या सहकार्याने मत्स्य खात्याची कारवाई

पणजी : अन्य राज्यांतून गोव्यात (Goa) येऊन मासेमारी केली जात असल्याच्या मच्छीमारांच्या वाढत्या तक्रारींवरून मत्स्य खाते (Goa Fisheries Department) सतर्क बनले आहे. कळंगुट (Calangute) येथे बेकायदेशीर मासेमारी करणारे महाराष्ट्रातील (Maharashtra) १० ट्रॉलर पकडण्यात आले. किनारपट्टी पोलिसांच्या (Goa Coastal Police) सहकार्याने मत्स्य खात्याने ही कारवाई केली.
बेकायदेशीर मासेमारीवर कारवाई करताना, गोवा मत्स्यव्यवसाय विभागाने बुधवारी कळंगुट किनाऱ्यावर महाराष्ट्र नोंदणीकृत १० ट्रॉलर जप्त केल्याची माहिती मस्त्य खात्यातर्फे देण्यात आली. गोव्यात येऊन मासेमारी करीत राज्यातील नियम व सागरी सीमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
यासंदर्भात माहिती देताना, मत्स्य खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी सांगितले की, स्थानिक उपजीविका आणि सागरी पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. “कारवाई सुरूच राहील आणि कायद्यानुसार बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर्सवर कठोर कारवाई केली जाणार’’ असल्याचे सांगितले.
किनारपट्टीवरील हालचालींवर मत्स्य खात्याचे लक्ष असून, देखरेख ठेवण्यासाठी गोवा किनारपट्टी पोलिसांची मदत घेतली जात आहे. गोव्याबाहेरून येऊन केल्या जात असलेल्या मासेमारीमुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या स्थानिक मच्छीमारांच्या वाढत्या तक्रारी होत्या.
त्याची दखल घेऊन कारवाई करीत ट्रॉलर्स जप्त करण्यात आले. त्यामुळे कारवाई केली जात असल्याचा स्पष्ट संदेश जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. घुसखोरीमुळे केवळ मत्स्य संसाधनावरच परिणाम होत नाही तर येथील पारंपारिक मच्छीमारांना फटका बसत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
अधिकाऱ्यांनी किनारपट्टीवर देखरेख वाढवली आहे. गस्त घालणाऱ्या नौका तैनात केल्या आहेत आणि मत्स्य विभाग व किनारपट्टी पोलिसांमधील समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
ही कारवाई गोव्याच्या सागरी संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी आणि स्थानिक मासेमार समुदायांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी चालवलेल्या मोहिमेचा एक असल्याचे मंत्री हळर्णकर म्हणाले.
मासेमारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड करणार व परवाने रद्द करणे यासह कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही गोव्यातील मच्छिमारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत,” असे हळर्णकर म्हणाले. गेल्या दोन महिन्यांत कर्नाटकातील ५ मासेमारी ट्रॉलर्स जप्त करण्यात आले होते.
मत्स्य विभागाने मच्छिमारांना संशयास्पद हालचालींची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. आणिर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे मंत्री हळर्णकर यांनी सांगितले.