विजय मर्चंट १६ वर्षांखालील स्पर्धा : उत्तराखंड ३ बाद १०७

पणजी: विजय मर्चंट ट्रॉफी सोळा वर्षाखालील मुलांच्या गोवा व उत्तराखंड यांच्यातील तीन दिवसीय एलिट गटातील सामन्याला भिलाई येथील बीएसपी क्रिकेट स्टेडियम येथे रविवारी सुरुवात झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गोवा संघाने आपल्या पहिल्या डावात ६७.५ षटकात सर्वबाद १८१ धावा केल्या. दिवस अखेर उत्तराखंड संघाने २३ षटकांच्या खेळात तीन बाद १०७ अशी मजल मारली होती. उत्तराखंडचा संघ अजून ७४ धावांनी पिछाडीवर आहे. सामन्याचे अजून दोन दिवस बाकी आहेत.
गोवा संघाकडून मोहम्मद उजेर याने सर्वाधिक नाबाद ५० धावा केल्या. सलामीचा फलंदाज साईराज गोवेकरने ४८ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त केवळ कर्णधार विनीत कामत (२७) याने थोडाफार प्रतिकार केला. उत्तराखंडच्या अभिमन्यू याने सर्वाधिक पाच गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना उत्तराखंड आघाडीचे तिन्ही खेळाडू गमावले आहेत. गोव्यातर्फे अनुराग बहादूरने २४ धावांत दोन तर सारंग गोवेकरने ३९ धावात एक गडी बाद केला आहे.