बर्च दुर्घटना; दंडा‌धिकाऱ्यांच्या अहवालानंतर होणार न्यायालयीन चौकशी : मुख्यमंत्री

तर आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशी करणार

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
10th December, 05:41 pm
बर्च दुर्घटना; दंडा‌धिकाऱ्यांच्या अहवालानंतर होणार न्यायालयीन चौकशी : मुख्यमंत्री

पणजी : बर्च बाय रोमिओ लेन क्लबला (Birch by Romeo Lane in Goa) आग (Fire) लागून २५ जणांचा झालेल्या मृत्यूप्रकरणात आयपीएस अधिकारी (IPS officer) जबाबदार असेल तर त्यांची देखील चौकशी होणार. आयएएस (IAS officer), आरपीएस वा कोणी जबाबदार असेल तर त्याला सोडले जाणार नाही. चौकशी होणारच असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

दंडा‌धिकाऱ्यांमार्फत सुरू असलेल्या चौकशीचा अहवाल आल्यावर इतर संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा पाठवून त्यांच्यावर कारवाई होणार. दंडा‌धिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतर घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. बर्च बाय रोमिओ लेन क्लबला आग लागून २५ जण मृत्यू पावल्यानंतर या घटनेचा तपास व सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठक घेतली. या बैठकीला पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, पोलीस महासंचालक आलोक कुमार व इतर अधिकारी उपस्थित होते. 

बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. बर्च बाय रोमीओ लेन क्लब दुर्घटनेची चौकशी दंडा‌धिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. तसेच दोन अधिकारी व तत्कालीन पंचायत सचिवाला निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी क्लबशी संबंधित ६ जणांना अटक केली आहे. गौरव लुथरा व सौरभ लुथरा यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलीस सीबीआय तसेच इतर एजन्सींच्या संपर्कात आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

क्लबला  नव्हता बांधकाम परवाना

बर्च बाय रोमीओ क्लबला बांधकाम परवाना नव्हता. पंचायतीने दिलेल्या व्यापारी परवान्यावर आधारून सर्व कार्यकर्म क्लबमध्ये सुरू होते. सरकारने ऑडीट सुरक्षा समिती तसेच कारवाई करण्यासाठी देखरेख समिती स्थापन केली आहे. पर्यटनासंबंधी आस्थापनांकडे ‘फायर एनओसी’ वा इतर सुरक्षा यंत्रणा नसल्यास समिती कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

पर्यटन हंगाम सुरू झाल्याने कायदा व सुव्यस्थेविषयी उपाययोजना करण्याबरोबरच कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीत दिले. हॉटेल्स, मद्यालये, रेस्टॉरंट, क्लब, वॉटरस्पोर्ट्स यांची तपासणी होणार. सुरक्षेचे उपाय नसल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई होणार. मद्यालयांना रात्री ११ नंतर परवाना नसल्यास दारू विक्री करण्यास मिळणार नाही. दोन वेळा नियम मोडल्यास अबकारी खाते परवाने निलंबित करणार. ‘रेंट अ बायक’, ‘रेंट अ कार’ यांनी नियम मोडल्यास कारवाई होणार. 


हेही वाचा