ठाकरे यांचे वय व राजकीय अनुभव पाहता वक्तव्य चुकीचेच

मडगाव: रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (RGP) अध्यक्ष मनोज परब यांनी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यावर केलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. ठाकरे यांचे वय आणि राजकीय प्रवास लक्षात घेता परब यांचे वक्तव्य अपमानजनक असून, त्यांनी ते तत्काळ मागे घेऊन ठाकरे यांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
गिरीश चोडणकर म्हणाले की, आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी केलेले विधान अपमानजनक आहे. माणिकराव ठाकरे हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील एक आदर्श नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्रात सहा वेळा आमदार म्हणून निवडून येऊन गृहमंत्रीपदही चांगल्या रितीने सांभाळले आहे. तेलंगणा येथील काँग्रेसच्या विजयातही त्यांचे मोठे योगदान आहे.
चोडणकर म्हणाले की, परब यांच्या वक्तव्यात राजकीय प्रगल्भता दिसत नाही, उलट त्यांचा संताप जास्त दिसून येत आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत युती व्हावी यासाठी ठाकरे यांनी चौकटीबाहेर जात आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध असतानाही प्रयत्न केले होते. असे असतानाही आरजीचे अध्यक्ष परब यांनी खालच्या पातळीवरील वक्तव्य केले असून, त्याचा आम्ही निषेध करतो. मनोज परब यांनी तत्काळ हे वक्तव्य मागे घेऊन माणिकराव ठाकरे यांची माफी मागावी, असे चोडणकर यांनी स्पष्ट केले.