ऑल इंडिया लॉयर्स युनियनच्या गोवा युनिटने आयोगाकडे दाखल केली होती तक्रार.

पणजी: गोव्यातील हडफडे येथील नाइटक्लब दुर्घटनेची (Arpora Fire Tragedy) गोवा मानवाधिकार आयोगाने (GHRC) दखल घेतली आहे. या घटनेत २५ जणांचा बळी गेल्याने, आयोगाने थेट मुख्य सचिव (Chief Secretary) आणि पोलीस महासंचालक (DGP) यांना नोटीस बजावली आहे. या अधिकाऱ्यांना तपशीलवार उत्तर दाखल करून ६ जानेवारी २०२६ रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मानवाधिकार उल्लंघनाची तक्रार
ऑल इंडिया लॉयर्स युनियनच्या (All India Lawyers Union) गोवा युनिटने मानवाधिकार आयोगाकडे ही तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत अग्निकांडात झालेल्या जीवितहानीमुळे गंभीर मानवाधिकार उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, या भयानक दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
संस्थात्मक तपासणीला सुरुवात:
या घटनेप्रकरणी आधीच गुन्हेगारी तपास, काही व्यवस्थापकांना अटक आणि सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाबद्दल मोठी चौकशी सुरू आहे. आता मानवाधिकार आयोगाच्या नोटिसीमुळे या दुर्घटनेवर संस्थात्मक तपासणीचे वाढते लक्ष केंद्रित झाले आहे. ६ जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत, ही आग नेमकी कशी लागली, आपत्कालीन प्रतिसाद (Emergency Response) पुरेसा होता का आणि प्रशासकीय यंत्रणेच्या त्रुटींमुळे दुर्घटनेची व्याप्ती वाढली का, यासह अनेक गंभीर मुद्द्यांवर तपास केला जाण्याची शक्यता आहे.
आजच्या घडामोडी :
१) 'बर्च बाय रोमियो लेन'चे मालक सौरभ व गौरव लुथरा यांचे पासपोर्ट गोवा पोलिसांच्या विनंतीनुसार परराष्ट्र खात्याने केले निलंबित.
२) सौरभ व गौरव लुथरा यांना थायलंडमध्ये घेतले ताब्यात. प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
३) लुथरा यांच्या प्रत्यार्पणाची पुढील कारवाई करण्यासाठी सीबीआयचे पथक थायलंडला जाणार.
४) बर्च बाय रोमिओ लेनचे सहमालक अजय गुप्ता यांना ७ दिसांची पोलीस कोठडी. म्हापसा न्यायालयाचा आदेश.