लुथराबंधूंना आज गोव्यात आणणार

थायलंडकडून हस्तांतरण : गोवा पोलीस पथक दिल्लीला रवाना


15 hours ago
लुथराबंधूंना आज गोव्यात आणणार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : हडफडे येथील बर्च नाईट क्लबमध्ये झालेल्या अग्नितांडव प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी क्लबचे मालक गौरव लुथरा व सौरभ लुथरा यांचे थायलंड सरकारने हस्तांतरण केले आहे. या दोघांना गोव्यात आणण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला सोमवारी रात्री रवाना झाले. मंगळवारी संशयितांना घेऊन हे पथक गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
थायलंड सरकारने संशयित लुथराबंधूंची हद्दपारीची प्रक्रिया रविवारी पूर्ण केली होती. सोमवारी संशयितांचे भारतीय दूतावासाकडे हस्तांतरण करण्यात आले. मंगळवारी सकाळी संशयितांना घेऊन इंटरपोल पथक दिल्लीत दाखल होणार आहे. त्यानंतर दोन्ही संशयितांना गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. यासाठी गोवा पोलिसांचे पथक सोमवारी रात्री दिल्लीला रवाना झाले. एका आयपीएस अधिकार्‍याच्या नेतृत्वाखालील या पथकात एक पोलीस निरीक्षक व कनिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश आहे. हे पथक संशयितांना ताब्यात घेऊन गोव्यात परतणार आहे. त्यानंतर हणजूण पोलीस संशयितांना रितसर अटक करतील.
अग्नितांडव घटनेची उच्च न्यायालयाकडून स्वेच्छा दखल
बर्च क्लबमधील अग्नितांडवाची गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेऊन अॅड. रोहित ब्राझ डिसा यांची अॅमिकस क्यूरी म्हणून नियुक्ती केली.
पुढील सुनावणी १२ जानेवारी २०२६ रोजी ठेवली आहे.‍
या प्रकरणी प्रदीप घाडी आमोणकर आणि सुनील दिवकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दुर्घटनेला जबाबदार संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती.
याचिकादारातर्फे अॅड. रोहित ब्राझ डिसा यांनी बाजू मांडली.
अॅड. डिसा यांनी क्लब बेकायदेशीर असताना त्याचा व्यावसायिक वापर होत असल्याचे न्यायालयाला सांगितले.
परवाने देताना स्थानिक संस्थांकडून कायद्याची अंमलबजावणी होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांनी कारवाई केल्यानंतर संबंधित प्राधिकरणाकडे धाव घेऊन आदेशाला स्थगिती मिळवतात. त्यामुळे अवैध बांधकामांमध्ये व्यवसाय चालू राहतात, असे मुद्दे अॅड. डिसा यांनी मांडले.
न्यायालयाने अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्राधिकरणांनी एकत्रितपणे काम करावे, असे निरीक्षण नोंदविले.
अॅमिकस क्यूरी अॅड. डिसा यांना दोन आठवड्यांत स्वेच्छा जनहित याचिकेसंदर्भात प्रक्रिया करण्याचा निर्देश जारी केला.
राज्य सरकारला दुर्घटना टाळण्यासाठी कोणती सुधारात्मक पावले उचलली जाऊ शकतात आणि कोणत्या अधिकाऱ्याला किंवा प्राधिकरणाला जबाबदार धरावे. या संदर्भात माहिती देण्याचा निर्देश जारी केला.
दंडाधिकारी समितीला आठवड्याची मुदतवाढ
बर्च क्लबला लागलेल्या आगीची चौकशी अद्याप पूर्ण झाली नसल्याने दंडाधिकारी समितीला आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारी अधिकारी तसेच सरपंच व जमीन मालकांची चौकशी अद्याप होणे बाकी असल्याने अहवाल सादर करण्यास विलंब होणार आहे. समितीने मागितलेली मुदतवाढ सरकारने मंजूर केली आहे, अशी माहिती चौकशी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिली.