उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी महिला होणार विराजमान

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्षपद महिलांसाठी राखीव


15 hours ago
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी महिला होणार विराजमान

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असणार आहे. तसेच दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाले आहे. आरक्षणाविषयीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
जिल्हा पंचायतीसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान झाल्यानंतर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहे. निकालानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी प्रत्येक २५ मतदारसंघ आहेत. दोन्ही जिल्हा पंचायतींच्या ५० मतदारसंघांमध्ये एकूण २२६ उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही जिल्हा पंचायतींतील प्रत्येकी ९ मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहेत.
मतदानाला आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, अन्य मंत्री, भाजपचे आमदार आपआपल्या भागात प्रचारात गुंतले आहेत. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, ‘आप’चे नेते प्रचारासाठी दारोदार फिरत आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’ उमेदवारांचा तीन दिवस प्रचार केला.
जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपद आलटून पालटून राखीव असते. प्रत्येक खेपेला एका जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपद, तर दुसऱ्या जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्षपद महिलांसाठी राखीव ठेवले जाते.
या मतदारसंघांतील निकालाकडे लक्ष
उत्तर गोव्यात हरमल, मोरजी (ओबीसी), कोलवाळ, कळंगुट, रेईश मागूश, सांताक्रूझ (ओबीसी), चिंबल, सेंट लॉरेन्स (ओबीसी), मये हे ९ मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहेत. या मतदारसंघांतून विजयी होणारी उमेदवार जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. दक्षिण गोव्यात उसगाव-गांजे, वेलिंग-प्रियोळ, बोरी, शिरोडा, नावेली (ओबीसी), रिवण (एसटी), बार्शे, खोला (ओबीसी), कुठ्ठाळी हे ९ मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहेत. या मतदारसंघांतून विजयी झालेली महिला उमेदवार दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीची उपाध्यक्ष होणार आहे. त्यामुळे वरील मतदारसंघांतील निकालाकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.