कडाक्याची थंडी काजू, आंब्यासाठी ठरणार वरदान!

कृषी संचालकांची माहिती : आणखी १५ दिवस थंडी हवी, दव मात्र नको


15 hours ago
कडाक्याची थंडी काजू, आंब्यासाठी ठरणार वरदान!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सध्याची कडाक्याची थंडी आंबा आणि काजू पिकांसाठी वरदान ठरली आहे. पाऊस लांबल्यामुळे यंदा आंब्याचा हंगाम उशिरा येण्याची शक्यता निर्माण झाली होती; मात्र सध्याच्या थंड वातावरणामुळे ही अडचण दूर झाली असून आंबा आणि काजू पिकांना मोठ्या प्रमाणात मोहोर फुटला आहे. परिणामी, येत्या मार्च-एप्रिल महिन्यातच आंबे मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध होतील, अशी माहिती कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली.


कृषी संचालक संदीप फळदेसाई पुढे म्हणाले, जेव्हा थंडी अधिक असते आणि त्यानंतर चांगले ऊन पडते, तेव्हा काजू, आंबा आणि फणस या पिकांना उत्तम मोहोर येतो. त्यामुळे उत्पादनही चांगले मिळते. सध्याचे थंड वातावरण आंबा आणि काजू पिकांसाठी अत्यंत अनुकूल ठरत आहे. अनेक ठिकाणी आंब्याला चांगला मोहोर आला असून काजूच्या झाडांनाही फुलोरा सुरू झाला आहे. आंबा लवकर बाजारात येतो, तेव्हा त्याला चांगला दर मिळतो. उशिरा आलेल्या आंब्यांना कमी भाव मिळतो आणि नंतर पावसात आंबे खराब होण्याचीही शक्यता असते. यंदा डिसेंबरमध्येच मोठ्या प्रमाणात मोहोर आल्यामुळे मार्चअखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला आंब्यांची मोठी आवक होईल.
दव पडल्यास धोका वाढणार
कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सावधगिरीचा इशाराही दिला आहे. ते म्हणाले, जर या काळात दव पडले, तर पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि पिकांचे नुकसान होऊ शकते. सध्या ही थंडी हळूहळू कमी होत असली तरी पुढील १५ ते २० दिवस थंड वातावरण टिकून राहिले, तर परिस्थिती आणखी अनुकूल ठरेल.


पावसामुळे उशीर, थंडीमुळे गती
यंदा उशिरा पडलेल्या पावसामुळे मोहोर उशिरा येण्याची शक्यता होती. मात्र थंड वातावरणामुळे आता झाडांना लवकर मोहोर फुटू लागला असून पिकेही वेगाने तयार होणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र
आंबा, काजू पिकांना लवकर मोहोर
मार्चअखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला बाजारात आंब्याची मोठी आवक शक्य
लवकर येणाऱ्या आंब्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता
आंबे बाजारात लवकर आल्यामुळे पावसामुळे नुकसान होण्याचा धोका टळणार