झेडपी निवडणूक : सासष्टीत मतदानाला संथ सुरुवात; दुपारनंतर मिळाला चांगला प्रतिसाद

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th December, 05:06 pm
झेडपी निवडणूक : सासष्टीत मतदानाला संथ सुरुवात; दुपारनंतर मिळाला चांगला प्रतिसाद

मडगाव : सासष्टीच्या नऊ मतदारसंघांत दुपारी दोन वाजेपर्यंत सुमारे ४४,३८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही सरासरी ४२.१४ टक्के इतकी राहिली. यात गिर्दोलीमध्ये सर्वाधिक ५०.५० टक्के मतदान झाले, तर नावेलीत मतदारांचा प्रतिसाद कमी लाभला. येथे ३८.४७ टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी मतदान केंद्रांबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती, मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच पोलिसांनी ही गर्दी पांगवली.

सासष्टीतील रायमध्ये १६,९२५, नुवे १५,२७३, कोलवा १७,५३१, वेळ्ळी १७,५४९, बाणावली २०,११९, दवर्ली १९,९१८, गिर्दोली १६,३६०, कुडतरी १९,८०० व नावेलीमध्ये १५,६७८ असे एकूण १,५९,१५२ मतदार आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत ४२.१४ टक्के मतदान झाले होते. दुपारी चार वाजेपर्यंतही विविध मतदान केंद्रांवर नागरिकांच्या मतदानासाठी रांगा दिसून आल्या.

* सकाळी दहा वाजेपर्यंत सासष्टीच्या रायमध्ये २१३७ (१२ टक्के), नुवेमध्ये २०६२ (१३.५० टक्के), कोलवामध्ये २१२७ (१२.१३ टक्के), वेळ्ळीत २१२५ (१२.११ टक्के), बाणावलीत २४४६ (१२.१६ टक्के), दवर्ली येथे २५३८ (१२.७४ टक्के), गिर्दोलीत २६४३ (१६.१६ टक्के), कुडतरीमध्ये २६४३ (१३.३५ टक्के) व नावेलीत १९१४ (१२.२१ टक्के) मतदारांनी मतदान केले.

* दुपारी बारा वाजेपर्यंत रायमध्ये ४५८८ (२७.११ टक्के), नुवेमध्ये ४३९० (२८.७४ टक्के), कोलवामध्ये ४७६५ (२७.१८ टक्के), वेळ्ळीत ४७०६ (२६.८२ टक्के), बाणावलीत ५३२५ (२६.४७ टक्के), दवर्ली येथे ५४७३ (२७.४८ टक्के), गिर्दोलीत ५५२३ (३३.७६ टक्के), कुडतरीमध्ये ५६१३ (२८.३५ टक्के) व नावेलीत ३९६५ (२५.२९ टक्के) मतदान झाले.

* दुपारी दोन वाजेपर्यंत रायमध्ये ६९२२ (४०.९० टक्के), नुवेमध्ये ६७८५ (४४.४२ टक्के), कोलवा येथे ७१९७ (४१.०५ टक्के), वेळ्ळीत ७०१५ (३९.९८ टक्के), बाणावलीत ८१९८ (४०.७५ टक्के), दवर्ली येथे ८४२५ (४२.३० टक्के), गिर्दोलीत ८२६२ (५०.५० टक्के), कुडतरीमध्ये ८२४५ (४१.६४ टक्के) व नावेलीत ६०३१ (३८.४७ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाल्यावर आमदार उल्हास तुयेकर यांनी रुमडामळ, दवर्ली, आके-बायश या ठिकाणांची पाहणी केली. "भाजप समर्थक मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी येत आहेत. भाजप सरकारने केलेला विकास, पायाभूत सुविधा आणि विविध सरकारी योजनांचा लाभ यांसह माजी जिल्हा पंचायत सदस्य परेश नाईक यांनी केलेली कामे लोकांच्या डोळ्यांसमोर आहेत. त्यामुळे नावेलीत लक्ष्मी शेटकर व दवर्लीत सत्यविजय नाईक यांचा विजय होईल," असा विश्वास आमदार तुयेकर यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे, बदल करण्याची ताकीद मतदारांच्या हातात आहे. राज्यातील परिस्थिती पाहता बदल घडवण्यासाठी व विकासकामांना साथ देण्यासाठी लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केले.

नावे शोधण्यात मतदारांचा वेळ वाया

 सासष्टीतील काही केंद्रांवर मतदारांकडे निवडणूक ओळखपत्रे होती, परंतु मतदार यादीत नाव शोधण्यात वेळ जात होता. नाव सापडण्यासाठी दहा मिनिटे लागत असल्याने आणि त्यानंतर पुन्हा रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिकांनी काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली.

मतदान केंद्राबाहेरील जमावावर आक्षेप 

रुमडामळ येथील एकाच शाळेत चार मतदान केंद्रे असल्याने बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. लोक गाड्या लावून तेथेच थांबले होते. त्या ठिकाणी आमदार उल्हास तुयेकर यांची उपस्थिती होती. त्यावर अपक्ष उमेदवार वरक यांनी आक्षेप घेत, आमदार अजूनही मते मागत आहेत, असा दावा केला. यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत केंद्राबाहेरील जमावाला पांगवले.


हेही वाचा