झेडपी निवडणूक : बार्देशमध्ये मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
20th December, 05:26 pm
झेडपी निवडणूक : बार्देशमध्ये मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

म्हापसा: बार्देश तालुक्यातील नऊही जिल्हा पंचायत मतदारसंघांत दुपारी ३ वाजेपर्यंत मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. काही केंद्रांवर सकाळी लवकर, तर काही ठिकाणी सकाळी १० आणि दुपारी १ नंतर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. तालुक्यातील नऊ मतदारसंघांतून एकूण ४३ उमेदवार रिंगणात असून, दुपारपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ८ ते १०, १० ते १२ आणि दुपारी १२ ते २ या वेळेत सर्वच मतदारसंघांत सरासरी १४ टक्के मतदान झाले. दुपारपर्यंत बार्देशमधील नऊ मतदारसंघांत सरासरी ३७ टक्के मतदान झाले असून, केवळ कोलवाळ मतदारसंघाने ५० टक्क्यांचा टप्पा ओलांडला होता.

दुपारी २ वाजेपर्यंतची मतदारसंघनिहाय टक्केवारी: शिवोली ४६.२९%, कोलवाळ ५१.१६%, हळदोणा ४५.३४%, सिरसई ४५.०२%, हणजूण ४८.६१%, कळंगुट ४५.४६%, सुकूर ४३.६१%, रेईश मागूश ४३.३०% आणि पेन्हा दी फ्रान्समध्ये ४५.२५% मतदान झाले आहे.

सकाळी लोक मतदानासाठी घराबाहेर पडल्याने अनेक केंद्रांवर गर्दी होती. त्यानंतरही मतदारांचा ओघ कायम राहिला. काही मतदान केंद्रांवर दुपारी १२ वाजेपर्यंत ३५ ते ४० टक्के, तर काही ठिकाणी १५ ते २० टक्के मतदान झाल्याचे दिसून आले.

यंदा अनेक उमेदवारांना मतदारांपर्यंत आपल्या चिन्हाची पावती पोहोचवता आली नाही. त्यामुळे पावती नसल्याने मतदारांना केंद्रावर आपला मतदान कार्ड क्रमांक सांगताना अडचणी आल्या. काही ठिकाणी निवडणूक एजंट आणि बीएलओ (BLO) कडून हा क्रमांक मिळवण्यातही मतदारांचा वेळ गेला.

मतदान केंद्रांवर वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांची ने-आण करण्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. उमेदवारांचे निवडणूक एजंट, पंच सदस्य आणि समर्थक कार्यकर्ते केंद्राच्या आवारात राहून आपल्या मतदारांना पोहोचवण्यास मदत करत होते. दरम्यान, मतदानाच्या पूर्वसंध्येला काही मतदारसंघांत उमेदवार आणि लोकप्रतिनिधींकडून मतदारांना विविध प्रलोभने दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

शिवोली ६, कोलवाळ ४, सिरसई ४, हळदोणा ६, हणजूण ५, कळंगुट ४, सुकूर ५, रेईश मागूश ४ आणि पेन्हा दी फ्रान्स मतदारसंघात ४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

हेही वाचा