डिचोलीत वृद्ध पिग्मी कलेक्टरची बॅग हिसकावून चोरट्यांचा पोबारा

धाडसी स्थानिकांनी चोरट्याला पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
डिचोलीत वृद्ध पिग्मी कलेक्टरची बॅग हिसकावून चोरट्यांचा पोबारा

डिचोली: डिचोली येथील कारेश्वर मंदिर परिसरात एका ७४ वर्षीय वृद्ध पिग्मी कलेक्टराला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कॅनरा बँकेसाठी पिग्मी गोळा करण्याचे काम करणाऱ्या या वृद्धाकडून चोरट्याने ४३ हजार ९० रुपयांची रोकड पळवून नेली. मात्र, परिसरातील जागरूक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे एका संशयित आरोपीला रंगेहात पकडण्यात यश आले असून, लुटलेली सर्व रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिग्मी कलेक्टर आपले दैनंदिन काम उरकून गोळा केलेली रोकड घेऊन जात असताना, कारेश्वर मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या चोरट्याने त्यांना लक्ष्य केले. वृद्धाला गाठून त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून चोरट्याने पळ काढला. या घटनेनंतर वृद्धाने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. स्थानिकांनी तत्काळ चोरट्याचा पाठलाग सुरू केला आणि पोलिसांनाही पाचारण केले. नागरिकांनी अमित गुजर (वय २०) या संशयिताला पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अमित गुजर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेली ४३ हजार ९० रुपयांची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ माजली असली, तरी स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका मोठ्या गुन्ह्याचा छडा लागून पीडित वृद्धाला त्यांचे पैसे परत मिळाले आहेत. या कामगिरीबद्दल डिचोली परिसरात नागरिकांचे कौतुक होत आहे.