कुणीही कसलेही आरोप करू शकतात : दामू नाईक; आरोपांची चौकशी होणार : मॉविन गुदिन्हो

पणजी : गृहनिर्माण प्रकल्पासाठी (Housing Project) भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्याकडे एका आमदाराने (MLA) १० लाख रुपयांची लाच मागितल्याची पोस्ट भाजपचे पूर्वीचे पदाधिकारी सावियो रॉड्रिग्ज यांनी टाकली आहे. या पोस्टमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सावियो रॉड्रिग्ज हे सध्या भाजपचे पदाधिकारी नाहीत. ते प्राथमिक सदस्य आहेत की नाही, ते मला माहिती नाही. कुणीही कसलेही आरोप करू शकतात.या आरोपात तथ्य नसते, असे भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.
आरोप केले म्हणून किती विश्वास ठेवायचा. पैसे मागितल्याच्या आरोपाची चौकशी होणार, असे वाहतूकमंत्री आणि भाजप आमदार मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले. नोकरीसाठी पैसे द्यो लागतात, असे आरोप यापूर्वी झाले आहेत. माजी आमदार व मंत्र्यांनी हे आरोप केले आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर सावियो रॉड्रिग्ज यांच्या ट्विटरवरील पोस्टमुळे पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच विषय चर्चेत आला आहे.
गृहनिर्माण प्रकल्पाला मान्यता मिळण्यासाठी दक्षिण गोव्याच्या एका पदाधिकाऱ्याकडे पहिल्याच वेळी निवडून आलेल्या एका आमदाराने १० लाख रुपये मागितले. हे पैसे संबंधित मंत्र्याला द्यावे लागतील असे आमदाराने सांगितले. काही काळानंतर हा पदाधिकारी पक्षाच्या मोठ्या पदावर पोचला तेव्हा त्यांनी थेट यावरून मंत्र्याकडे वाद घातला. मंत्र्याने पैसे मागितलेच नसल्याचे सांगितले. आमदाराला बोलावून आणले आणि १० लाख रुपये दोन हप्त्यांनी दोन आठवड्यांच्या आत परत केले, असा पोस्ट सावियो रॉड्रिग्ज यांनी ट्वीटरवर टाकला आहे.