सरकारी यंत्रणांची डोळेझाक : कायद्याला धाब्यावर बसवून मॅन्युअल जुगार सुरू

पणजी : गोव्यातील (Goa) जमिनीवरील कॅसिनोंमध्ये (Casino) कायद्याला थेट आव्हान देत बेकायदा लाईव्ह गेमिंग सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्यातील जुगारविषयक कायदे अत्यंत स्पष्ट असतानाही या बेकायदा प्रकारांकडे प्रशासन, पोलीस (Goa Police) व संबंधित यंत्रणा सर्रास दुर्लक्ष करत असल्याने; कॅसिनो चालकांचे अक्षरशः आयते फावत असल्याचा आरोप होत आहे. गोव्याच्या प्रचलित जुगार कायद्यानुसार, ‘लाईव्ह गेमिंग’ची (मॅन्युअल पद्धतीने खेळले जाणारे खेळ) परवानगी केवळ मांडवी नदीतील जहाजांवरील कॅसिनोंनाच देण्यात आली आहे. जमिनीवर असलेल्या तारांकित हॉटेल्समधील कॅसिनोंना केवळ इलेक्ट्रॉनिक किंवा स्लॉट गेम्सची परवानगी आहे. मात्र, सध्या अनेक जमिनीवरील कॅसिनोंमध्ये मॅन्युअल पद्धतीने जुगार खेळला जात असल्याचे दिसून येत आहे.
बंदी असलेल्या खेळांचा उघडपणे खेळ
सोशल मीडियावर सध्या काही व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. यामध्ये जमिनीवरील कॅसिनोंमध्ये खालील खेळ खुलेआम सुरू असल्याचे दिसत आहे. यामध्ये बॅकारॅट, तीन पत्ती, पोकर अंदर-बाहर या खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असून, कायद्याचे उल्लंघन उघडपणे दिसत असतानाही संबंधित यंत्रणांनी डोळे झाकून घेतल्याचे चित्र आहे.
पोलिसांची कारवाई केवळ ‘नाटक’?
यापूर्वी गोवा विधानसभेत विरोधी आमदारांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर पोलीस यंत्रणेने काही ठिकाणी छापे टाकून कारवाई केल्याचे दाखवले होते. मात्र, ही कारवाई केवळ दिखाऊ किंवा तात्पुरती ठरल्याचे आता स्पष्ट होत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हे बेकायदा व्यवहार जोमाने सुरू झाले असून, आता त्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे.