चौथ्या कसोटीत ४ गडी राखून मात : मालिकेत ऑस्ट्रेलियाची ३–१ ने आघाडी

मेलबर्न : ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ४ गडी राखून विजय मिळवत तब्बल १८ कसोटी सामन्यांपासून सुरू असलेली ऑस्ट्रेलियातील विजयाची प्रतीक्षा संपवली. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) खेळल्या गेलेल्या या सामन्यामुळे मालिकेत ऑस्ट्रेलियाची आघाडी ३–१ अशी कायम राहिली असली, तरी इंग्लंडसाठी हा विजय ऐतिहासिक ठरला आहे.
इंग्लंडला ऑस्ट्रेलियात शेवटचा कसोटी विजय २०११ मध्ये सिडनी (एससीजी) येथे मिळाला होता. त्यानंतर खेळल्या गेलेल्या १८ कसोट्यांपैकी ऑस्ट्रेलियाने १६ सामने जिंकले, तर २ सामने अनिर्णित राहिले होते. २०१३–१४ च्या ॲशेस मालिकेतील ५–० पराभवानंतर इंग्लंडचा हा दुष्काळ सुरू झाला होता.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य दिले होते, जे इंग्लिश संघाने ६ गडी गमावून पूर्ण केले. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात १३२ धावांवर सर्वबाद झाली होती. यापूर्वी ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात १५२ धावांवर बाद झाली होती, तर इंग्लंड पहिल्या डावात केवळ ११० धावाच करू शकला होता.
अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ४२ धावांची आघाडी मिळाली होती, पण दुसऱ्या डावात इंग्लंडने शानदार पुनरागमन करत सामना आपल्या नावावर केला. सामन्यात एकूण ७ बळी घेणाऱ्या इंग्लिश वेगवान गोलंदाज जोश टंगला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
१७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला दुसऱ्या डावात चांगली सुरुवात मिळाली. संघाला पहिला धक्का ५१ धावांवर बसला. मिचेल स्टार्कने बेन डकेटला क्लीन बोल्ड केले. त्याने २६ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या. ब्रायडन सहा धावा करून जे रिचर्डसनचा बळी ठरला. यानंतर जॅक क्रॉलीने जेकब बेथेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली आणि इंग्लंडची स्थिती मजबूत केली. क्रॉली ४८ चेंडूंमध्ये ३७ धावा करून बाद झाला. तर, रूट आणि बेथेल यांच्यात २५ धावांची भागीदारी झाली. बेथेल ४० धावा करून बाद झाला. रूट १५ धावा करून बाद झाला. तर, कर्णधार बेन स्टोक्स दोन धावाच करू शकला. हॅरी ब्रूक १८ धावा आणि जेमी स्मिथ तीन धावा करून नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क, रिचर्डसन आणि बोलंडने प्रत्येकी २-२ बळी घेतले.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक ४६ धावा केल्या. कर्णधार स्टीव्ह स्मिथ २४ धावांवर नाबाद राहिला, तर कॅमेरॉन ग्रीनने १९ धावा जोडल्या. संघातील आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही, ज्यात तीन खेळाडू शून्य धावांवर बाद झाले. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सने उत्कृष्ट गोलंदाजी करत ४ बळी घेतले. बेन स्टोक्सने ३ आणि जोश टंगने २ बळी घेतले. गस ॲटकिन्सनला १ बळी मिळाला.
अॅटकिन्सनच्या हॅमस्ट्रिंगला ताण
बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन जखमी होऊन मैदानाबाहेर गेला. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात त्याच्या डाव्या मांडीवर ताण आला. सकाळी अॅटकिन्सनने नाईटवॉचमन स्कॉट बोलंडची विकेट घेतली, पण आपल्या पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू टाकताना त्याला त्रास जाणवला. चेंडू टाकल्यानंतर त्याने लगेच आपली डावी मांडी पकडली आणि उपचारासाठी ड्रेसिंग रूममध्ये गेला. त्याच्या जागी बदली क्षेत्ररक्षक ऑली पोपला मैदानात उतरवण्यात आले. जेवणानंतर अॅटकिन्सन पुन्हा मैदानात परतला नाही. अॅटकिन्सनने या कसोटीच्या पहिल्या दिवशी १४ षटकांत २८ धावा देऊन २ बळी घेतले होते.
पहिल्या दिवशी विक्रमी बळी
सामन्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात १५२ धावांवर सर्वबाद झाला, तर इंग्लंडचा संघ ११० धावाच करू शकला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ४२ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४५.२ षटकांत आणि इंग्लंडचा पहिला डाव २९.५ षटकांत संपला. म्हणजेच ७५.१ षटकांत २० बळी पडले. ॲशेसदरम्यान मेलबर्नमध्ये पहिल्याच दिवशी इतके बळी पडले असण्याची १२३ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी १९०१-०२ मध्ये पहिल्या दिवशी २५ बळी पडले होते.