एका अल्पवयीनाची अपना घरात पाठवणी. तिघेही गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात सक्रिय असलेल्या गुन्हेगारी टोळीचे सदस्य.

पणजी : साखळी येथील 'कृष्णा पेट्रोल पंप'वर धाडसी चोरी करणाऱ्या एका संघटित गुन्हेगारी टोळीचा डिचोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हे संशयित गोवा आणि शेजारील महाराष्ट्र राज्यात सक्रिय असलेल्या एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचे सदस्य असल्याचे तपासात उघड झाले असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या संघटित गुन्हेगारी कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी २८ डिसेंबर रोजी पहाटे ५:५० च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कारापूर-तिस्क येथील सुनील पर्वतकर यांच्या पेट्रोल पंपाच्या कार्यालयात प्रवेश करून ९,००० रुपयांची रोकड आणि सीसीटीव्ही फुटेज असलेला डीव्हीआर चोरून नेला होता. या तक्रारीनंतर डिचोली पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना उपनिरीक्षक रश्मीर परब मातोंडकर यांनी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तीन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी पेट्रोल पंपावरील चोरीची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे महेश शिव शेट्टी (१९, रा. करई) आणि भुवन टिळकराज पिल्लई (१८, रा. पेडे-म्हापसा) अशी असून, एका अल्पवयीन मुलाला मेरशी येथील 'अपना घर' मध्ये पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीची असल्याच्या संशयावरून एक होंडा डिओ दुचाकीही जप्त केली आहे. तपासादरम्यान असे समोर आले की, हे संशयित म्हापसा, कोलवाळ आणि इतर भागांत दुकान फोडी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांत गुंतलेले आहेत. तसेच महाराष्ट्रातील बांदा आणि कुडाळ भागातही त्यांनी अनेक गुन्हे केले आहेत. हे सर्वजण अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात वावरत असल्याचा खुलासा देखील पोलिसांनी केला आहे.
या आरोपींचे संघटित गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेता, त्यांच्यावर बीएनएस २०२३ च्या कलम ११२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर आणि डिचोलीच्या उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक विजय राणे सरदेसाई यांच्या नेतृत्त्वाखाली महिला उपनिरीक्षक सोनाली हरमलकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.