
पैंगीण : पर्तगाळी येथील श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ येत्या २ जानेवारीपासून काही काळासाठी भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मठ समिती आणि बांधकाम समितीने घेतला आहे. मठाच्या ५५० व्या सार्ध पंच शतमानोत्सवानिमित्त मठ परिसरात ‘रामायण थीम पार्क’ उभारले जाणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि बांधकामात अडथळा येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

अखंड भजनी सप्ताहाची सांगता मठाच्या सार्ध पंच शतमानोत्सवाचा भाग म्हणून २४ डिसेंबरपासून सुरू असलेल्या अखंड भजनी सप्ताहाचा समारोप ३१ रोजी संध्या. ७ वा. होणार आहे. श्रीमद् विद्याधीश तीर्थस्वामी महाराजांच्या मंगलोत्सवाने या सोहळ्याची सांगता होईल. या शेवटच्या दिवशी भटकळ, कुमटा, पणजी, धारवाड अशा विविध ठिकाणची १७ भजन पथके आपली सेवा रुजू करणार आहेत.
ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा ७७ फूट उंचीचा पुतळा आहे, तिथेच भव्य रामायण थीम पार्क साकारले जाणार आहे. या सप्ताहात गोवा, कर्नाटक, मुंबई आणि केरळमधील एकूण १७४ भजनी पथकांनी आपला कलाविष्कार सादर केला. बांधकामाच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने पुढील आदेशापर्यंत मठात प्रवेश बंद असेल.
भाविकांना आवाहन
मठ बांधकाम समितीने भाविकांना या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत भाविक अखंड भजनी सप्ताहाचा आणि दर्शनाचा लाभ घेऊ शकतील, मात्र २ जानेवारीपासून प्रवेशावर निर्बंध असतील.