सरकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र गळ्यात घालणे सक्तीचे

अन्यथा नियमानुसार होणार शिस्तभंगाची कारवाई

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
सरकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र गळ्यात घालणे सक्तीचे

पणजी : गोव्यातील (Goa) सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Staff)  यापुढे ओळखपत्र (Identity Card)  गळ्यात घालणे सक्तीचे करण्यात आले आहे.  तसे न केल्यास ते गैरवर्तन (Misconduct) म्हणून गणले जाईल आणि दोषी कर्मचाऱ्यावर केंद्रीय नागरी सेवा (आचार) नियम, १९६४ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. 

आदेशात म्हटले आहे की, ‘ड्युटी’वर असताना सरकारी कर्मचाऱ्यांनी आपले ओळखपत्र घालणे आवश्यक आहे. कार्यालयात, ‘ड्युटी’च्या निमित्ताने बाहेर जाताना ओळखपत्र गळ्यात असणे आवश्यक आहे. यासंदर्भात अनेक वेळा सूचना देऊनही त्याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे ओळखपत्र देण्याचा उद्देश सफल होत नाही. ओळखपत्र हे कार्यालयीन शिस्त, लोकांना सरकारी कर्मचाऱ्यांची ओळख पटावी व सरकारी कार्यालयात सुरक्षा व्यवस्था बळकट करणे यासाठी देण्यात येतात. मात्र, कर्मचारी सहकार्य करीत नसल्याचे दिसून आले आहे. 

यापुढे हे सहन केले जाणार नसून, सरकारी कार्यालयातील सर्व प्रमुख, महामंडळांचे प्रमुख व सरकारी कार्यालयांशी संबंधितांनी कर्मचारी ओळखपत्र गळ्यात घालतात की नाही ते पहावे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे. 

हेही वाचा