अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

पणजी : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर (Goa Beaches) अलोट गर्दी झाली. समुद्रकिनाऱ्यांवरील मनमोहक सूर्योदय, सूर्यास्त, रुपेरी वाळू, खळाळत्या लाटा, कल्पवृक्षाची बने व एकूण हिरवाईने नटलेला निसर्ग पाहण्यासाठी देशी, विदेशी पर्यटकांचे (Tourist)
पाय आपसूकच गोव्याकडे वळत असतात. तेच दृष्य सध्या गोव्यात दिसत आहे. हजारो देशी,विदेशी पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. त्यात स्थानिकांचाही समावेश होता. लोकांची गर्दी वाढल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
गोव्यात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन एकूण परिस्थिती हाताळाणण्यासाठी ३,५०० पोलीस तैनात करण्यात आले होते. मद्याच्या धुंदीत वाहने हाकणारऱ्यांवर लक्ष ठेवणे, वाहतुकीचे नियम मोडून वाहने हाकत वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे व एकूण परिस्थिती हाताळण्याची मोठी जबाबदारी पोलीसांवर होती. त्यासाठी पोलीस ठिकठिकाणी कसरत करताना दिसत होते. ‘फ्लायओव्हर’च्या बांधकामामुळे एनएच ६६ राष्ट्रीय हमरस्त्यावरील पर्वरीच्या पट्ट्यात वाहतुकीला मोठा अडथळा ठरला. गोव्यातील गावे व शहरातील ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गर्दी केलेली दिसत होती. एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. अनेक ठिकाणी मध्यरात्री आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यता आली. गावांमध्ये पारंपारिक नृत्य करण्यात आले. हॉटेल्स, नाईटक्लबमध्ये व्यावसायिक पार्ट्या रंगल्या.
काही ठिकाणी तयार केलेले ‘ओल्ड मॅन’चे पुतळे मध्यरात्रीनंतर जाळण्यात आले. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी जनसागर लोटला होता. बागा, कळंगुट, हणजूण, मांद्रे, मोरजी, हरमल, बोगमाळो, कोलवा, बाणावली, उतोर्डा, माजोर्डा, आगोंदा, पाळोळे, गालजीबाग या समुद्रकिनाऱ्यांवर देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी केली होती. लोकांच्या गर्दीमुळे झालेली रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, फटाक्यांची आतषबाजी, ट्रान्स पार्ट्या, मध्यरात्रीच्या प्रार्थना व विविध कार्यक्रमांनिशी सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला तर नववर्षांचे स्वागत करण्यात आले.