फटाक्यांमुळे बेताळभाटी किनाऱ्यावर ठेवलेच्या रापणीच्या जाळ्याला आग; १३ लाखांचे नुकसान

नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी केली होती आतिषबाजी..

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
फटाक्यांमुळे बेताळभाटी किनाऱ्यावर ठेवलेच्या रापणीच्या जाळ्याला आग; १३ लाखांचे नुकसान

मडगाव: बेताळभाटी समुद्रकिनारी ठेवलेल्या रापणीच्या मासेमारी जाळ्याला फटाक्यांच्या ठिणगीमुळे आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत मच्छीमार सांतान फर्नांडिस यांचे सुमारे १३ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, पर्यटकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी केलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळेच ही आग लागल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेताळभाटी किनाऱ्यावर मच्छीमार आपली जाळी साठवून ठेवतात. सांतान फर्नांडिस यांच्या मालकीचे रापणीचे जाळे बुधवारी किनारी भागात ठेवले होते. गुरुवारी सकाळी फर्नांडिस किनाऱ्यावर आले असता, त्यांना आपली जाळी जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले.

नववर्षाच्या स्वागतासाठी कोलवा आणि बेताळभाटी किनारी भागात पर्यटकांची मोठी गर्दी होती. बुधवारी रात्री सुमारे सव्वा बाराच्या सुमारास पर्यटकांनी फोडलेल्या फटाक्यांच्या ठिणग्या जाळ्यावर पडल्याने ही आग भडकली. आग लागताच स्थानिक नागरिक आणि जीवरक्षकांनी ती विझवण्याचा शर्थीचे प्रयत्न केले. मडगाव अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले, मात्र जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत जाळ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.

या आगीत सांतान फर्नांडिस आणि डोमराड फर्नांडिस यांचे मिळून १३ लाखांचे नुकसान झाले आहे. जाळी जळाल्याने त्यांचा रापणीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि मत्स्योद्योग खात्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पीडित मच्छीमारांनी केली आहे.


हेही वाचा