कुशावती जिल्ह्यामुळे स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील : दामू नाईक

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
कुशावती जिल्ह्यामुळे स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील : दामू नाईक

पणजी : सरकारने तयार केलेल्या नवीन कुशावती जिल्ह्यामुळे या भागात नवीन पायाभूत सुविधा निर्माण होतील; परिणामी स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. राज्याची लोकसंख्या आणि पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक होते, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले. शुक्रवारी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार नीलेश काब्राल, विनय तेंडुलकर आदी उपस्थित होते.

दामू नाईक पुढे म्हणाले की, नवीन जिल्ह्यासाठी प्रशासकीय इमारती, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि रस्ते तयार केले जातील. या सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो; मात्र याचा दीर्घकालीन फायदा येथील स्थानिकांनाच होईल. या भागात प्रामुख्याने एसटी समाजाची लोकसंख्या अधिक आहे. कुशावती जिल्ह्यामुळे या समाजासाठी केंद्राच्या तसेच राज्याच्या विविध सामाजिक कल्याणकारी योजना राबवणे अधिक सोपे होणार असून, यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास होईल.

ते पुढे म्हणाले की, राज्याची लोकसंख्या वाढत असून वर्षाकाठी सुमारे एक कोटी पर्यटक गोव्याला भेट देतात. अशा स्थितीत प्रशासकीय विकेंद्रीकरण केल्याने स्थानिकांची सोय होईल. गोव्यात प्रत्येक नवीन गोष्टीला विरोध करण्याची काहींना सवयच आहे. अशा लोकांनी यापूर्वी कोकण रेल्वे आणि मोपा विमानतळालाही विरोध केला होता; मात्र आता तेच लोक या सुविधांचा लाभ घेण्यात आघाडीवर आहेत. नवीन जिल्ह्याबाबत कोणाचे काही आक्षेप असल्यास त्यांनी ते सरकारला कळवावेत, त्यावर नक्कीच विचार केला जाईल. मात्र, केवळ विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही.

'कुशावती' नाव योग्यच! 

मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले की, कुशावती जिल्ह्यामुळे केपे, सांगे, काणकोण आणि धारबांदोडा येथील लोकांना शिक्षण, नोकरी किंवा अन्य सरकारी कामांसाठी मडगावला जावे लागणार नाही. कुशावती नदीकाठी प्राचीन काळापासून संस्कृती बहरली होती, त्यामुळे नवीन जिल्ह्याला 'कुशावती' हे नाव देणे पूर्णतः योग्य आहे.

हेही वाचा