भारतातील काही ठिकाणी बर्ड फ्लूचा शिरकाव; लक्षणे आणि उपाय काय?

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
भारतातील काही ठिकाणी बर्ड फ्लूचा शिरकाव; लक्षणे आणि उपाय काय?

नवी दिल्ली : भारतातील (India) काही भागांत बर्ड फ्लूचा (Bird Flu) प्रादुर्भाव दिसून आला आहे. काही लक्षणे दिसत असल्यास वैद्यकीय (Medical) सल्ला घेण्याचे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे. आरोग्य विभागही सतर्क बनला आहे. केरळातील (Kerala) कोट्टायम व अलाप्पुझा जिल्ह्यांत बर्ड फ्लू पसरल्याचे दिसून आला. त्यानंतर शेजारील राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ताम‌िळनाडू (Tamil Nadu) सरकारने खबदरीची उपाययोजना आखताना केरळला लागून असलेल्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये सतर्कता बाळगली आहे. केरळहून होणारी कोंबड्यांची वाहतूक, अंडी व पोल्ट्री उत्पादनांवर तात्पुरती बंदी घातली आहे. 

भारतातील अंडी उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून ओळखल्या जात असलेल्या ताम‌िळनाडूतील नामकल्ल जिल्ह्यामध्ये खास जैव सुरक्षा उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याठिकाणी नियमित लाखो अंड्यांचे उत्पादन होते. बर्ड फ्लू आजार पसरू नये म्हणून पोल्ट्री फार्म्समध्ये कडक पाळत ठेवली जात आहे.

बर्ड फ्लूचा संसर्ग होतो कसा?

बर्ड फ्लूचा विषाणू बाधित पक्ष्यांची लाळ, विष्ठा किंवा श्र्वासोच्छवासाच्या थेंबांतून माणसांमध्ये पसरू शकतो. मात्र, योग्यरित्या शिजवलेले चिकन, अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लू होत नाही. उच्च तापमानात हा विषाणू नष्ट होतो. 

बर्ड फ्लूची लक्षणे 

डोळे येणे, तीव्र ताप व थकवा येणे, खोकला व घसा खवखवणे, स्नायू दुखणे, मळमळ आणि उलट्या होणे, जुलाब, श्र्वास घेण्यास त्रास होणे. 

खबरदारीचे उपाय

१. पक्ष्यांच्या संपर्कात येणे टाळणे : आजारी किंवा मृत पक्ष्यांच्या संपर्कात येणे टाळणे. पक्ष्यांच्या मृत्यूची माह‌िती त्वरीत प्रशासनाला द्यावी.

२. अन्न, खाद्यपदार्थ शिजवून खाणे : मांस, अंडी, चिकन कमीतकमी ७५ अंश सेल्स‌ियस तापमानावर नीट शिजवून खावे. कच्चे दूध पिणे टाळावे. 

३. हात स्वच्छ धुवावेत : कच्चे मांस, पक्षी किंवा तत्सम वस्तूंना हात लावल्यावर किमान २० सेकंद साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत.

४. संरक्षणात्मक साधनांचा वापर करणे : पक्ष्यांच्या संपर्कात जावे लागत असल्यास डोळ्यांचा चष्मा, हातमोजे व मास्क यांचा वापर करावा. 




हेही वाचा