
पणजी : काही दिवसांपूर्वी गोवा विद्यापीठ तसेच एनआयओतर्फे करंझाळे समुद्र किनाऱ्यावरील माशांबाबत एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये येथील माशांमध्ये धातूचे प्रमाण अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे लोकांमध्ये भीती तसेच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांनी येथील मासे खावेत का नाहीत याबाबत तीन दिवसांत स्पष्टीकरण द्यावे; अशी मागणी विविध मच्छीमार संघटनांनी केली.
बुधवारी संघटनांच्या शिष्टमंडळाने मच्छीमार खात्याचे उपसंचालक चंद्रकांत वेळीप यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. याबाबत करंझाळे रापणकार संघटनेचे अध्यक्ष फ्रान्सिस वाझ यांनी सांगितले की, अहवालानुसार येथील बांगडे आणि तार्ले माशांमध्ये धातूचे प्रमाण अधिक आहे. मात्र; हे दोन्ही मासे खोल अरबी समुद्रातून येतात. ते समुद्रात सतत एका ठिकाणावरून दुसरीकडे हलत असतात. अशावेळी करंझाळेत सापडणाऱ्या या माशांमध्ये धातूचे प्रमाण अधिक आहे; असे म्हणणे अयोग्य आहे.
ते म्हणाले, येथेच आता पाण्यात एक तरंगता टॉवर उभारण्यात आला आहे. यामुळे आम्हाला मासे पकडताना त्रास होत आहे. याविषयी देखील आम्ही खात्याकडे तक्रार केली आहे. येथील मासेमारीवर ५ हजार जण अवलंबून आहेत. असले अहवाल आमच्या पोटावर पाय आणू शकतात. काही लोकांना करंझाळे बीच आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. यासाठीच असले प्रकार सुरू आहेत; अशी आम्हाला शंका आहे. मात्र; आम्ही कधीही हे प्रयत्न सफल होऊ देणार नाही.
आग्नेल रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, खात्याच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी एनआयओ, गोवा विद्यापीठ आणि मच्छीमार संघटनेची बैठक बोलावली आहे. यामध्ये आम्ही आमचे मुद्दे मांडणार आहोत. मासे प्रदूषित असले असे गृहीत धरले तर प्रदूषणाचे नेमके कारण देखील सांगितले पाहिजे. कॅसिनो किंवा अन्य कारणांनी मासे प्रदूषित होत आहेत का हे स्पष्ट करावे. असे अहवाल येथे येऊ घातलेल्या तारांकित हॉटेलसाठी आहेत का हेही स्पष्ट झाले पाहिजे.
प्रसंगी न्यायालयात जाणार
अहवालात करंजाळे येथील मासे प्रदूषित असल्याचे म्हटले आहे. वास्तविक हे मासे करंजाळे येथील नसून अरबी समुद्रातील आहेत. याबाबत दोन्ही संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचे आग्नेल रॉड्रिग्ज यांनी सांगितले.