४-१ मालिका खिशात : मिचेल स्टार्क मालिकावीर

सिडनी : ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धची अॅशेस मालिका ४-१ अशी जिंकत घरच्या मैदानावर सलग चौथ्यांदा मालिका विजय साजरा केला. सिडनी कसोटीच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडने दिलेले १६० धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि सामना ५ गड्यांनी जिंकला. कॅमेरॉन ग्रीन (२२) आणि अॅलेक्स केरी (१६) यांनी अखेरच्या क्षणी संघाला विजय मिळवून दिला.
इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगला संघर्ष केला. जेकब बेथेल याने १५४ धावांची शानदार खेळी केली, पण इंग्लंडचा संपूर्ण संघ ३४२ धावांवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियासमोर १६० धावांचे आव्हान होते.
ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात जेक वेदराल्ड आणि ट्रॅव्हिस हेड यांनी ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करत केली. मात्र जोश टंग याने दोघांनाही बाद करत ऑस्ट्रेलियाला २ बाद ७१ असे अडचणीत टाकले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आणखी तीन विकेट्स गमावल्या, पण अखेर ग्रीन-केरी जोडीने संघाला विजयापर्यंत पोहोचवले.
इंग्लंड दुसऱ्या डावात ३ बाद २१९ अशा मजबूत स्थितीत होता आणि त्यांना आघाडीही मिळाली होती. मात्र ब्यू वेब्स्टर याने हॅरी ब्रूकला (४२) बाद करत सामन्याचे चित्र बदलले. वेब्स्टरने गोलंदाजीत १३ षटकांत ५१ धावांत ३ गडी बाद अशी शानदार कामगिरी केली. कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे फलंदाजी करू शकला नाही, याचा इंग्लंडला मोठा फटका बसला.
स्मिथचा ऐतिहासिक विक्रम
या सामन्यात स्टीव्ह स्मिथने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. स्मिथने ५०९७ धावा केल्या असून डॉन ब्रॅडमन यांच्या ४०२८ धावांचा विक्रम मोडला.
मिचेल स्टार्कची मालिकेत प्रभावी कामगिरी
ऑस्ट्रेलियाच्या या यशात मिचेल स्टार्क याची भूमिका निर्णायक ठरली. त्याने संपूर्ण मालिकेत ३१ विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली आणि तो मालिकावीर ठरला. सामन्यानंतर सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारून ती कर्णधार पॅट कमिन्सच्या हातात दिली आणि दोघांनी मिळून ट्रॉफी उंचावत विजय साजरा केला.
उस्मान ख्वाजाला ‘गार्ड ऑफ ऑनर’
ही कसोटी उस्मान ख्वाजाची अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच ठरली. जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा इंग्लंडच्या खेळाडूंनी त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. मात्र तो केवळ ६ धावांवर बाद झाला आणि त्याच्यासह त्याच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट झाला.