विजय हजारे ट्रॉफी एलिट : ऋतुराजच्या नाबाद १३४ धावा

पणजी : विजय हजारे ट्रॉफी एलिट स्पर्धेत गोवा संघाला गुरुवारी महाराष्ट्राकडून ५ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. जयपूर येथील डॉ. सोनी स्टेडियमवर हा ‘अ’ दर्जाचा सामना खेळविण्यात आला. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ७ गडी गमावून २४९ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना गोव्याला ९ गडी गमावून २४४ धावांपर्यंतच मजल मारता आली.
महाराष्ट्राने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांची सुरुवात भयावह झाली. १३.१ षटकांच्या षटकात त्यांनी फलकावर केवळ २५ धावा लावल्या होत्या व त्यांचे पाच गडी तंबूत परतले होते. ऋतुराज व घोष यांच्यात भागीदारी होत असताना दर्शनने घोषला बाद करत महाराष्ट्राचे ६ बाद ५२ अशी नाजुक स्थिती केली. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने १३१ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार व ६ षटकारांसह नाबाद १३४ धावांची खेळी करताना विकी ओस्तवाल (५३) याच्यासह सातव्या गड्यासाठी १०६ धावांची भागीदारी केली. ओस्तवाल बाद झाल्यानंतर राजवर्धन हंगारगेकर याने १९ चेंडूंत नाबाद ३२ धावा चोपत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यास हातभार लावला. गोव्याचा व्ही. कौशिक सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३८ धावांत ३ गडी बाद केले. अर्जुन तेंडुलकर, दीपराज गावकर, दर्शन मिसाळ व ललित यादव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना गोव्याचा संघ बिनबाद ८३ असा मार्गक्रमण करत होता. कश्यप बखले (४२) व स्नेहल कवठणकर (४०) यांनी संघाला १४.५ षटकांत ८३ धावांची खणखणीत सलामी दिली. या दोघांसह सुयश प्रभुदेसाई (१०) काही षटकांच्या अंतराने बाद झाल्याने गोव्याचा संघ ३ बाद ९९ असा अडचणीत सापडला. यानंतर गोव्याने ठराविक अंतराने गडी गमावले. कर्णधार दीपराज गावकर याने ३४ धावा केल्या. मधल्या फळीत अष्टपैलू ललित यादव (नाबाद ५७) याने शेवटचा गडी कौशिक (नाबाद ४) याला साथीला घेत विजयासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडले.
गोव्याचा या स्पर्धेतील हा शेवटचा सामना होता. गोव्याने आपल्या मोहिमेची सांगता १२ गुणांसह केली. ‘क’ गटात असलेल्या गोव्याने ३ विजय व ४ पराभव अशी कामगिरी केली.
ऋतुराजचा विक्रम
ऋतुराज गायकवाडने ११४ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०६ धावा करत त्याने शतक झळकावले. ऋतुराज गायकवाडने या शतकासह लिस्ट ए क्रिकेटमधील ९ डावांमध्ये ५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह ऋतुराजचे हे लिस्ट एमधील २०वे शतक आहे. २० शतकांसह लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या विक्रमाची त्याने बरोबरी साधली आहे. ऋतुराजने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ९५ डावांमध्ये २० शतके आणि १९ अर्धशतके केली आहेत.