शोध मराठी मनाचा जागतिक संमेलनाचे उद्घाटन

पणजी : मराठी ही केवळ संवाद व साहित्याची भाषा न राहता ती शिक्षण, संशोधन व प्रशासनाची भाषा व्हायला हवी. सशक्त विचार व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण व्हायला हवे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
जागतिक मराठी अकादमी आयोजित शोध मराठी मनाचा या २१व्या जागतिक मराठी संमेलनाचे शुक्रवारी उद्घाटन झाले. पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे विचार मांडले.
दैदीप्यमान इतिहास लाभलेली मराठी भाषा ही साहित्य, कविता, कादंबरी पुरतीच सीमित न राहता ती शेतकरी, कष्टकरी समाजाची भाषा आहे. बरीच ग्रामीण लोकगीते मराठीत आहेत. मराठी भाषा ही वास्तव्याशी जोडलेली असल्याने ती जिवंत आहे. आज एआय, मशिन लर्नींग, डिजीटल तंत्रज्ञान याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. स्पर्धात्मक युगात तरुणांनी मराठी भाषा डिजीटल मंचावर पोचवायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. बा.भ. बोरकर यांची माझ्या गोव्याच्या भूमीत...ही कविता अदधृत करताना मुख्यमंत्र्यांनी संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांचा संदर्भ देत मराठीची परंपरा व थोरवी विषद केली.
तंत्रज्ञानाने अनेक सुविधा निर्माण केल्या असल्या तरी त्याचबरोबर अनेक नवीन प्रश्नही निर्माण केले आहेत. या प्रश्नांची सोडवणूक आपण व्यक्तिगत तथा सामाजिक पातळीवर ही नवीन तंत्रज्ञाने कशी राबवतो, यावर अवलंबून आहे. तंत्रज्ञान अंगीकारताना सुद्धा त्याचा चांगला उपयोग कसा करून घ्यायचा व दुरूपयोग कसा टाळायचा, या प्रश्नाच समाधान पण अशाच सामाजिक विचारमंथनातून पुढे यायला हवे, असे डॉ. काकोडकर म्हणाले.
यावेळी उद्योजक अनिल खंवटे याना जागतिक मराठी भूषण सन्मान तर महेश मांजरेकर यांना कला जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे हे उपस्थित राहू शकले नसल्याने त्यांचा व्हर्चुअल स्वरूपातील संदेश प्रसारीत करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळेही उपस्थित होते. हे संमेलन तीन दिवस चालेल. कविसंमेलने तथा विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत.
मराठी माणूसपण जागृत ठेवण्यास मदत करते
जगात आज जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत जिंकण्याच्या हव्यासापोटी माणस स्वत:तला माणूस विसरत आहेत काय, अशी शंका येते. मराठीने आपल्याला समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा दिला असून या वारशाचे जतन स्पर्धेत राहून सुद्धा माणूसपण जागृत ठेवण्यास मदत करते. आपल्या मूळाशी जवळीक आपल्याला एकट पडू देत नाही, असे अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. अनिल काकोडकर म्हणाले.