आगरवाडा जैवविविधता मंडळाने घेतली सरकारकडे धाव

पेडणे : पेडणे तालुक्यातील शापोरा नदीपात्रात आगरवाडा-चोपडे परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अवैध व्यवसायामुळे नदीच्या पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला असून, आगरवाडा जैवविविधता मंडळाने (Biodiversity Board) यासंदर्भात राज्य जैवविविधता महामंडळाच्या सदस्य सचिवांकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पेडणे तालुक्यातील शापोरा आणि तेरेखोल या दोन्ही नद्यांमध्ये बेकायदेशीर रेती उपसा ही एक गंभीर समस्या बनली आहे. दोन महिन्यांपूर्वी उगवे येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर तेरेखोल नदीतील उत्खनन तात्पुरते बंद असले, तरी शापोरा नदीत मात्र रेती माफियांनी धुमाकूळ घातला आहे. आगरवाडा-चोपडे पंचायत क्षेत्रात कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने रेती काढली जात आहे. आगरवाडा जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच अमोल राऊत यांनी यासंदर्भात आवाज उठवत, या उत्खननामुळे नदीतील जैवविविधता नष्ट होत असल्याचे म्हटले आहे.
नदीतील रेती व्यवसाय हा या भागातील आर्थिक कणा मानला जात असला, तरी सध्या सुरू असलेले बेकायदेशीर उत्खनन नदीचे पात्र आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान करत आहे. विशेष म्हणजे, किनारी सुरक्षा पोलीस (Coastal Police) या सर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे रेती माफियांना कोणाचेही भय उरले नसून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा 'रात्रीस खेळ' थांबवावा आणि पर्यावरणाचे रक्षण करावे, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.