पर्यटकांची गोव्यालाच पसंती! २०२५ मध्ये १ कोटी ८ लाख पर्यटकांची भेट

मागील दोन वर्षांचे विक्रम मोडीत.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
10th January, 04:16 pm
पर्यटकांची गोव्यालाच पसंती! २०२५ मध्ये १ कोटी ८ लाख पर्यटकांची भेट

पणजी: निसर्गसौंदर्य आणि अथांग समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याने पर्यटन क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. पर्यटन खात्याने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२५ या वर्षात गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या एकूण संख्येने १ कोटी ८ लाखांचा टप्पा पार केला असून, २०२३ आणि २०२४ या वर्षांतील सर्व जुने रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. कोविड-१९ महामारीनंतर पर्यटन क्षेत्राचे झालेले हे पुनरुज्जीवन राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आशादायक मानले जात आहे.

सविस्तर आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये १,०२,८४,६०८ देशांतर्गत (देशी) पर्यटकांनी गोव्याला पसंती दिली, तर ५,१७,८०२ परदेशी पर्यटकांनी गोव्याच्या संस्कृतीचा आनंद लुटला. २०१७ मध्ये ७७ लाखांच्या घरात असलेली ही संख्या आता १,०८,०२,४१० वर पोहोचली आहे. कोविडच्या संकटानंतर २०२३ पासून पर्यटकांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत असून, २०२४ मध्ये १ कोटी ४ लाखांचा टप्पा गाठल्यानंतर २०२५ मध्ये यात आणखी मोठी भर पडली आहे.

गोव्याच्या या यशात सुधारित पायाभूत सुविधा आणि वाढलेल्या हवाई संपर्काचा मोठा वाटा आहे. विशेषतः मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे विमान फेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. चार्टर विमानांद्वारे येणाऱ्या परदेशी पर्यटकांचा ओघ अजूनही महत्त्वाचा असून, २०२५ मध्ये १८९ चार्टर उड्डाणांद्वारे सुमारे ४० हजार परदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. दाबोळी आणि मोपा अशा दोन्ही विमानतळांवरून ही सेवा सुरू असल्याने पर्यटकांची सोय झाली आहे.

पर्यटन तज्ज्ञांच्या मते, शासनाची प्रोत्साहनात्मक धोरणे आणि विविध नवनवीन पर्यटन उपक्रमांमुळे गोवा हे देशातील आघाडीचे पर्यटनस्थळ म्हणून आपले स्थान अधिक भक्कम करत आहे. देशी पर्यटकांच्या संख्येत झालेली ही अभूतपूर्व वाढ गोव्याला वर्षभर पर्यटन सुरू राहणारे राज्य म्हणून ओळख मिळवून देत आहे. आगामी काळात ही वाढ अधिक गतीने होईल, असा विश्वास पर्यटन खात्याने व्यक्त केला आहे.


हेही वाचा