वीज कामगारांना जीवे मारण्याची धमकी; काशिनाथ शेट्ये यांनी केली पोलीस स्थानकात तक्रार

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
वीज कामगारांना जीवे मारण्याची धमकी; काशिनाथ शेट्ये यांनी केली पोलीस स्थानकात तक्रार

पणजीः वीज कामगारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार काशिनाथ शेट्ये यांनी पणजी पोलीस स्थानकात (Panjim Police Station)  केली आहे. बेकायदा केबल कापण्यासाठी गेलो असता; डिजीटल नेटवर्क आणि एजकोम टेलीकोमन्युनिकेशन या कंपनीच्या लोकांनी एका राजकारण्याचे नाव घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे शेट्ये यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

पणजी परिसरात बेकायदा केबल काढण्याचे काम हातात घेतले आहे. या विषयीच्या आदेशाला उच्च न्यायालयात (High Court) आव्हान देण्यात आले आणि केबल ओढण्यासाठी न्यायालयाने स्थगिती वा कसलीच परवानगी दिलेली नाही. असे असूनही दर दिवशी बेकायदेशीरपणे केबल ओढत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

या कंपनीच्या लोकांनी मिळेल तसे इंटरनेट केबल कमकुवत झालेल्या विजेच्या खांबावर लावून लोकांचा जीव धोक्यात घालून उच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. वीज खात्याच्या मालमत्तेला हात लावल्याप्रकरणी जेव्हा त्यांना विचारले तेव्हा डिजीटल नेटवर्क आणि एजकोम टॅलीकोम्युनिकेशनच्या लोकांनी खात्याच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य करण्यापासून रोखले. 

त्यानंतर त्यांनी एका सामर्थ्यवान राजकारण्याची आपल्याला मदत मिळटे, असे सांगून सरकारी अधिकाऱ्यावर दबाव घालण्यास सुरवात केली. ही कारवाई मागे न घेतल्यास तुला जीवे मारून टाकतो; अशी धमकी या लोकांनी दिली. त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा नोंद करून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी शेट्ये यांनी तक्रारीत केली आहे. 


हेही वाचा