
पणजी : गोव्यातील (Goa) शेळवण, कुडचडे (Curchorem) येथे वॅगनर कार (Car) आणि डंपर ट्रक (Truck) यांच्यामध्ये मोठा अपघात (Accident) झाला. या अपघातात वॅगनर चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला गंभीर जखमी स्थितीत हॉस्पीटलात (Hospital) दाखल केले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचीही बरीच हानी झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला. अपघात नेमका कसा घडला याचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षाच्या शेवटी व यावर्षीच्या जानेवारी महिन्याच्या सुरवातीला अपघातांची संख्या वाढली आहे. छोटेमोठे अपघात सुरू आहेत. त्यात काहीजणांचा बळी गेला आहे तर काहीजण जखमी झाले आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटी व जानेवारी महिन्यात गोव्यात देशी, विदेशी पर्यटकांची संख्या वाढत असते. त्यामुळे वाहनांची संख्या व रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ ही वाढत आहे. त्यातच नियम धाब्यावर बसवून चालवली जाणारी वाहने, मद्याच्या धुंदीत वाहने चालवली जात असल्याने अपघात वाढत आहेत. गोव्यात होणारे जास्त अपघात हे निष्काळजीपणे वाहने चालवल्याने होत असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही विधानसभा अधिवेशनात दिलेल्या माहितीत निष्काळजीपणे वाहने चालवल्याने गोव्यात अपघात वाढत असल्याचे सांगितले होते. काही पर्यटकही दारूच्या नशेत वाहने चालवून अपघातात भर घालत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.