फॉल्टी SUV कार: गोव्यातील ग्राहकाला मिळाला १५ लाखांचा रिफंड!

ग्राहक तक्रार निवारण कोर्टाचा निर्णय

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
फॉल्टी SUV कार: गोव्यातील ग्राहकाला मिळाला १५ लाखांचा रिफंड!

पणजी: महागडी गाडी खरेदी करूनही वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे मनस्ताप सहन करावा लागलेल्या सांताक्रुझ येथील एका ग्राहकाला उत्तर गोवा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. खरेदी केलेले वाहन सदोष असल्याचे ताशेरे ओढत, आयोगाने वाहन कंपनी, आणि वाहन विक्रेते यांना संयुक्तपणे १५ लाख रुपये ग्राहकाला रिफंड करण्याचे आदेश दिले आहेत.

सांताक्रुझ येथील एकाने १० सप्टेंबर २०२३ रोजी २४ लाख ४० हजार ६६६ रुपये खर्चून  सात आसनी गाडी खरेदी केली होती. या खरेदीसाठी त्यांनी २३ लाख रुपयांचे वाहन कर्जही घेतले होते. मात्र, लाखो रुपये खर्चून घेतलेली ही गाडी केवळ चार महिनेच नीट चालली. एके दिवशी सकाळी मुलांना शाळेत सोडायला जात असताना अचानक गाडी बंद पडली.

दुरुस्ती केल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत पुन्हा गाडीत बिघाड झाला आणि ती बंद पडली. वारंवार येणाऱ्या या तांत्रिक अडचणींमुळे गाडी चालवणे असुरक्षित असल्याचे ग्राहकाच्या  लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी संबंधित कंपन्यांना कायदेशीर नोटीस धाडली, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांनी अखेर ग्राहक आयोगाकडे धाव घेतली.

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, वाहन कंपनीने उत्पादनातील दोषांचे (Manufacturing Defects) आरोप फेटाळून लावले. तक्रारदाराने आपला दावा सिद्ध करण्यासाठी कोणताही तज्ञ अहवाल सादर केला नसल्याचा युक्तिवाद कंपनीने केला. मात्र, आयोगाच्या अध्यक्षा बेला नाईक यांनी हा युक्तिवाद अमान्य केला. मोठी रक्कम मोजल्यानंतरही गाडी वारंवार बंद पडत असेल आणि त्यामुळे ग्राहकाला ती चालवणे जोखमीचे वाटत असेल, तर तो गंभीर दोष असल्याचे आयोगाने नमूद केले. वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे ग्राहकाला मानसिक त्रास आणि अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागल्याचे निरीक्षण नोंदवत आयोगाने कंपन्यांना जबाबदार धरले आणि १५ लाख रुपये परतावा देण्याचा निकाल दिला.