दवर्ली-दिकरपाल ग्रामसभेत भू-सर्वेक्षणावरून रणकंदण

पालिकेत विलीनीकरणाच्या भीतीने ग्रामस्थ आक्रमक!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
14 mins ago
दवर्ली-दिकरपाल ग्रामसभेत भू-सर्वेक्षणावरून रणकंदण

मडगाव : शहरी भागातील जमीन सर्वेक्षणात दवर्ली-दिकरपाल पंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. दहा वर्षांपूर्वीही असा प्रयत्न झाला होता, तेव्हाही स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध दर्शवला होता. आता पुन्हा एकदा पंचायत क्षेत्रातील या भू-सर्वेक्षणाला दवर्ली-दिकरपालच्या नागरिकांनी ग्रामसभेत कडाडून विरोध केला आहे.

दवर्ली-दिकरपाल पंचायतीची विशेष ग्रामसभा रविवारी सकाळी पंचायत सभागृहात पार पडली. यावेळी सरपंच मिनीन कुलासो यांनी माहिती दिली की, 'भूमी अभिलेख आणि सर्वेक्षण संचालनालया'कडून (Directorate of Settlement & Land Records) यासंदर्भात नोटीस जारी करण्यात आली असून, त्याची एक प्रत पंचायतीला प्राप्त झाली आहे. या सूचनेनुसार, मडगाव शहरासोबतच आके, दवर्ली, नावेली, नुवे, सुरावली आणि राय या भागांचा समावेश जमीन सर्वेक्षणात करण्यात आला आहे. या प्रक्रियेत घरे आणि इतर मालमत्तांची मोजणी केली जाणार आहे. या विषयावर नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामसभेत बोलताना अँड्र्यू नामक ग्रामस्थाने भीती व्यक्त केली की, सरकारकडून पंचायतींचे हक्क हिरावून घेण्याचे प्रकार सुरू आहेत. केवळ सचिवांना अधिकार देणारी कायदा दुरुस्ती याचेच उदाहरण आहे. आता पंचायत क्षेत्राचा समावेश नगरपालिका क्षेत्रात झाल्यास त्याचे गंभीर परिणाम नागरिकांवर होतील. पंचसदस्यांऐवजी नगरसेवक येतील आणि छोटी-मोठी कामे करण्यासाठी लोकांना नगरपालिकेत फेऱ्या माराव्या लागतील. याशिवाय एफएसआय (FSI) वाढवण्यात आल्यास शेतजमिनी शिल्लक राहणार नाहीत आणि गावाचे नैसर्गिक स्वरूप नष्ट होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

नागरिकांच्या प्रखर विरोधानंतर ग्रामसभेत सर्वेक्षणाविरोधात ठराव घेण्यात आला. मात्र, या ग्रामसभेपूर्वी पंच सदस्यांची औपचारिक बैठक झाली नव्हती. त्यामुळे येत्या २४ जानेवारी रोजी पंचांची बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी पुन्हा विशेष ग्रामसभा बोलावून भू-सर्वेक्षणाला विरोधाचा अधिकृत ठराव घेतला जाईल, असे सरपंच मिनीन कुलासो यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या महत्त्वाच्या ग्रामसभेला पाच पंच सदस्य अनुपस्थित राहिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न असताना लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती अयोग्य असून, पुढील सभेला सर्वांनी उपस्थित राहावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.