मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेची दुसरी विशेष रेल्वे १४०० भाविकांसह अयोध्येला रवाना

रामललाच्या दर्शनासाठी भक्तांचा मोठा उत्साह.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेची दुसरी विशेष रेल्वे १४०० भाविकांसह अयोध्येला रवाना

मडगाव: 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा' योजनेंतर्गत दुसरी विशेष रेल्वे मडगाव स्थानकातून अयोध्येसाठी रवाना झाली. राज्यातील एकूण १४०० भाविक या यात्रेत सहभागी झाले असून, यानंतर आणखी दोन रेल्वे अयोध्येसाठी सोडल्या जाणार आहेत.



मडगाव येथून सोमवारी दुपारी दोन वाजता या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. दक्षिण गोव्यातील भाविक मडगाव येथून, तर उत्तर गोव्यातील भाविक थिवी स्थानकावरून या गाडीत स्वार झाले. यावेळी आमदार दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर, आमदार उल्हास तुयेकर आणि आमदार तथा जीटीडीसीचे अध्यक्ष केदार नाईक उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंजुरीनंतर यावर्षी 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा' योजनेला नव्याने सुरुवात झाली आहे. या वर्षातील पहिली रेल्वे वेलांकिनी सायबिणीच्या दर्शनासाठी गेली होती, तर आता दुसरी रेल्वे अयोध्या येथील राममंदिरात श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाली आहे.


राम लला दर्शन योजना : दर्शनार्थियों के परिवहन, भोजन, सुरक्षा, स्वास्थ्य की  रहेगी व्यवस्था


या विशेष रेल्वेतून १४०० भाविक देवदर्शनासाठी गेले आहेत. आमदार केदार नाईक यावेळी म्हणाले की, यापूर्वीही या योजनेच्या माध्यमातून रेल्वेगाड्या अयोध्येला गेल्या होत्या आणि आम्ही स्वतःही रामदर्शनासाठी गेलो होतो; मात्र त्यावेळी मंदिराचे काम पूर्ण झाले नव्हते. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आता पहिल्यांदाच राज्यातील भाविक अयोध्येसाठी रवाना होत आहेत." या यात्रेचा लाभ ५० ते ७० वयोगटातील भाविकांना घेता येत असून, त्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वेमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.



आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले की, या योजनेचा लाभ राज्यातील अनेक नागरिकांना होत आहे. अयोध्येसह वेलांकिनी, तिरुपती आणि शिर्डी यांसारख्या तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाची संधी भाविकांना मिळत आहे. अयोध्येसाठी यानंतरची रेल्वे २६ जानेवारी आणि त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी रवाना होईल. सरकारने भाविकांसाठी पाणी, जेवण आणि निवासाची उत्तम व्यवस्था केली असून, जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आमोणकर यांनी यावेळी केले.

हेही वाचा