कर्नाटकात डीजीपीचा कथित अश्लील चाळ्यांचा व्हिडिओ व्हायरल; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
कर्नाटकात डीजीपीचा कथित अश्लील चाळ्यांचा व्हिडिओ व्हायरल; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

बंगळुरू : कर्नाटकात (Karnataka) पुन्हा एकदा उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी संबंधित कथित व्हिडिओ प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. डीजीपी (DGP) दर्जाचे आयपीएस (IPS) अधिकारी डॉ. रामचंद्रराव यांचा महिलांसोबत अनुचित वर्तन करतानाचा कथित व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कार्यालयीन परिसरातच चित्रीत करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री (Chief Minister)  सिद्धरामय्या यांनी दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्यालयीन वेळेत व कर्तव्यावर असतानाच डॉ. रामचंद्रराव यांनी महिलांसोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचे या कथित व्हिडिओत दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या कपड्यांमध्ये महिला कार्यालयात येताना त्यांना मिठी मारणे व चुंबन घेणे असे प्रकार व्हिडिओत असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ गुप्त कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्ड करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे पोलिस दलाच्या शिस्तीवर, प्रतिष्ठेवर आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. संबंधित महिलांवर जबरदस्ती झाल्याचा थेट आरोप नसला, तरी शासकीय कार्यालयात, कार्यालयीन वेळेत आणि पोलिस गणवेशात अशा प्रकारचे वर्तन झाल्याचा आरोप असल्याने तीव्र टीका होत आहे.

सध्या, डॉ. रामचंद्रराव हे नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे डीजीपी म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्य सरकार या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कायद्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, “डीजीपी रामचंद्रराव यांच्याशी संबंधित कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. कोणतीही तडजोड न करता कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल.” बेळगाव जिल्ह्यातील नंदगड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “कोणताही अधिकारी कितीही मोठ्या पदावर असला, तरी कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.” दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी लवकरच अधिकृत आदेश जारी होण्याची शक्यता असून, पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

बदनामी करण्यासाठी बनवला बनावट व्हिडीओ : डीजीपी रामचंद्रराव 

दरम्यान, हा बनावट व्हिडीओ आपली बदनामी करण्यासाठी कुणी तरी तयार करून सर्वांना पाठवला असल्याचा दावा डीजीपी रामचंद्रराव यांनी केला आहे.

हेही वाचा