भाजीसाठी शेजारी राज्यांवर अवलंबून

पणजी : गोव्यात (Goa) भाजीपाल्याच्या (Vegetable) मागणीसाठी राज्याला मोठ्या प्रमाणावर शेजारी राज्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. मागील दोन वर्षांत महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटकातून (Karnataka) एकूण सुमारे १.७४ लाख टन भाजीपाल्याची आयात करण्यात आली आहे. मात्र, एका वर्षाच्या तुलनेत बाह्य राज्यांतून येणाऱ्या भाजीपाल्यात सुमारे २ हजार टनांची घट नोंदविण्यात आली आहे. त्यातील ४७ टक्के भाजीचा पुरवठा गोवा फलोत्पादन महामंडळाला (Goa Horticulture Corporation) होत असल्याची माहिती कृषी खात्याने दिली आहे.
कृषी खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ या वर्षात ८८,४५६ टन, तर २०२४-२५ मध्ये ८५,५७७ टन भाजीपाल्याची आयात झाली. गोवा कृषी उत्पादन व पशुधन विपणन कायदा २००७ अंतर्गत अधिसूचित झालेल्या भाज्या जशा की, कांदा, बटाटा, हिरवी व सुक्की मिरची, वांगी आणि कणगे या भाजीपाल्याची गेल्या दोन वर्षांत एकूण ५४,०४४ टन आयात शेजारील महाराष्ट्र व कर्नाटकातून झाली आहे.
तपशीलवार पाहता, कांद्याची आयात २०२३-२४ मध्ये १४,३६९ टन, तर २०२४-२५ मध्ये १३,४७१ टन झाली. बटाट्याची आयात अनुक्रमे १०,६३५.०६ टन व १२,१७९.०८९ टन इतकी होती. हिरवी मिरची २०२३-२४ वर्षात ५०७ टन तर २०२४-२५ मध्ये ६६१ टन, सुकी मिरची २०२३-२४ या वर्षात ९४३ तर २०२४-२५ मध्ये १,१५३ टन, वांगी २०२३-२४ मध्ये ५१ तर २०२४-२५ साली ६० टन. कणगे २०२३-२४ मध्ये ४ टन तर २०२४-२५ मध्ये ११ टन अशी आयात नोंदविण्यात आली आहे.
गोवा फलोत्पादन महामंडळाने २०२३-२४ मध्ये ६१,९४७ टन, २०२४-२५ मध्ये ५८,०४२ टन तर १ एप्रिल ते २२ डिसेंबर २०२५ दरम्यान १६,१८७ टन भाजीपाल्याची आयात केली आहे. या आयातीत भेंडी, कोबी, गाजर, फ्लॉवर, वालपापडी, चिटकी, मिरची, कांदा, बटाटा, टोमॅटो, बीट, दुधी, कारले, ढब्बू मिरची, लसूण, आले, कोथिंबीर, मेथी, मटार, पालक, पुदिना, मुळा, तांबडी भाजी, शेपू, कांद्याची पात, सुरण, कणगी, तोंडली यांसह विविध भाजीपाल्यांचा समावेश आहे.