बर्च क्लब दुर्घटना : हडफडेचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर यांना अखेर अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
बर्च क्लब दुर्घटना : हडफडेचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर यांना अखेर अटक

पणजी : हडफडेचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर याला हणजूण पोलिसांनी (Anjuna Police) अखेर अटक केली. बर्च क्लबला (Birch Club) दिलेल्या परवान्यांमुळे वादात सापडला होता. काल बुधवारी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने (High court) अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रोशन रेडकर अखेर आज सकाळी म्हापसा न्यायालयात (Mapusa Court) शरण आला. 

अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून त्याने उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळल्याने, आणखी पर्याय नसल्याने रोशन रेडकर आज गुरुवारी सकाळी म्हापसा न्यायालयात शरण आल्यानंतर त्याला हणजूण पोलिसांनी अटक केली. यापूर्वी पंचायत खात्याने सरपंच म्हणून त्याला अपात्र ठरवले होते. 

काल बुधवारी उच्च न्यायालयाने रेडकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. गोवास्थित (Goa) मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. आशिष चव्हाण यांनी यासंदर्भातील आदेश दिला होता. माजी सरपंच रोशन रेडकर पंचायत कर्मचारी व संबंधितांवर प्रभाव टाकण्याच्या पदावर होता. त्यामुळे तो साक्षीदारांना धमकावू शकतो किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकून पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करू शकतो. त्याला ज्यावेळी चौकशीसाठी बोलावले होते, त्यावेळी जमाव करून तपासात अडथळा आणला होता, असे निरीक्षण नोंदवून बर्च क्लबमधील अग्न‌ितांडव प्रकरणी हडफडे नागवाचे तत्कालीन सरसंप रोशन रेडकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. 

पोलीस तपासात आणला होता अडथळा

७ डिसेंबर २०२५ रोजी पोलिसांनी रोशन रेडकर याला चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलावले होते. त्यावेळी सुमारे १०० लोकांचा जमाव जमवून पोलिसांवर दबाव टाकण्याचा व तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सरकारने पक्षाने ठेवला होता. 


हेही वाचा