
पणजीः गोव्यातील (Goa) आयएएस (IAS), आयपीएस (IPS), आयएफएस (IFS) आणि गोवा पोलीस (Goa Police) तसेच नागरी सेवेतील अधिकारी, मामलेदार, बीडीओ या सर्वांसाठी रामदेव बाबा योगाचे प्रशिक्षण देणार आहेत. २४ जानेवारीला योगसेतू जवळ पहाटे ४.३० वाजता उपस्थित राहण्याची सूचना नियोजन आणि सांख्यिकी संचालनालयाने परिपत्रकाद्वारे केली आहे.
नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालय, पतंजली रिसर्च फाउंडेशन, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने भारत आंतरराष्ट्रीय आयुर्वेद आणि वेलनेस एक्स्पो तसेच शिखर परिषद २०२६ याची पहिली आवृत्ती घडवून आणली जाणार आहे. तीन दिवस हा कार्यक्रम होणार असून, २३ ते २५ जानेवारी, २०२६ या दिवसांत डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इंडोअर स्टेडियम, बांबोळी, गोवा येथे होणार आहे.
आयुर्वेद, वेलनेस आणि समग्र आरोग्य पद्धतींचा प्रचार करण्याचा हेतू या एक्स्पो आणि शिखर परिषदेचा आहे. देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक, वैद्य आणि धोरण निर्माते या कार्यक्रमात एकत्र येऊन पारंपारिक वैद्यकीय आणि वेलनेस क्षेत्रातील ज्ञान, नवकल्पना आणि उत्तम पद्धतींचा समावेश या कार्यक्रमात होणार आहे.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून परम् पूज्य योगऋषी श्री बाबा रामदेवजी यांचे विशेष योग सत्र २४ जानेवारीला सकाळी ५ वाजता योग सेतु जवळ भगवान परशुराम पुतळयाच्या ठिकाणी होणार आहे. हे योग सत्र शारीरिक, मानसिन आणि आध्यात्मिक आरोग्य राखण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने आयोजित केले आहे.
या विषयी आयएएस, आयएफएस, आयपीएस, गोवा नागरी सेवेतील वरिष्ठ आणि कनिष्ठ श्रेणी अधिकारी, गोवा पोलीस सेवेतील वरिष्ठ आणि कनिष्ठ श्रेणी अधिकारी, विभाग प्रमुख, मामलेदार, संयुक्त मामलेदार, दक्षता अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांना योग सत्रात सहभागी होण्याचे निर्देश संचालनालयाने परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
सर्व अधिकाऱ्यांनी पहाटे ४.३० वाजता उपस्थित रहावे. योग सत्रासाठी पांढरा टी-शर्ट हा ड्रेस कोड असणार आहे. अधिकाऱ्यांना पांढरा टी-शर्ट आणि चटई देण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.