रशियन दूतावासाचे प्रतिनिधी उपस्थित

पणजी : पेडणे तालुक्यात (Pernem Taluka) दोन रशियन महिलांचे कथित खून (Murder of 2 Russian Womens in Goa, India) करून खळबळ उडवून दिलेला रशियन नागरिक संशयित अलेक्सी लिओनोव्ह याने सध्या मौन बाळगळे आहे. खून करण्यात आलेल्या दोन्ही महिलांचे अंत्यविधी गोव्यातच करण्यात आले. कुटुंबीयांच्या तसेच भारतातील रशियन दूतावासाच्या मान्यतेने अंत्यविधी करण्यात आले. यावेळी रशियन दूतावासाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांमागे गोव्यातील (Goa) पेडणे तालुक्यात दोन रशियन महिलांचे खून करण्यात आल्याचे पुढे येताच एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी पोलिसांनी अलेक्सी लिओनोव्ह याला अटक करून चौकशी केली असता दोन रशियन महिलांचा खून केल्याची कबुली दिली होती. एलेना कास्थानोव्हा (३७ वर्षे) व एलिना वानिवा या दोघांचा त्यात समावेश होता. एलेना कास्थानोव्हा यांचा मृतदेह हरमल येथील एका भाड्याच्या खोलीत सापडला होता. शरीरावर जखमा होत्या. अशाच प्रकारे एलिना हिचाही मृतदेह सापडला होता. पोलिसांनी अटक करून चौकशी केली असता, संशयित अलेक्सी याने गोव्यासहीत भारतातील इतर राज्यांतील वास्तव्यात अनेकांचे खून केल्याचे सांगत एकच खळबळ माजवून दिली होती.
मात्र, संशयित अलेक्सी हा पोलिसांना चक्रावत असल्याचे नंतर पोलीस तपासात उघड झाल्याचे पोलिस अधिकारी सांगतात. सध्या, दोन रशियन महिलांच्या खूनप्रकरणासंदर्भात त्याच्याकडून अधिक माहिती पोलीस घेत आहेत. आणखी खून केल्याच्या त्याच्या जबानीत काहीच तथ्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कारण त्याने नावे घेतलेल्या इतर महिला जीवंत असल्याचे तपासात आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
रशियन महिलांचे गोव्यातच अंत्यविधी
दरम्यान, खून करण्यात आलेल्या एलेना कास्थानोव्हा, एलिना वानिवा या दोन्ही महिलांचे अंत्यविधी गोव्यातच करण्यात आले. कुटुंबीयांच्या तसेच भारतातील रशियन दूतावासाच्या मान्यतेने अंत्यविधी करण्यात आले. यावेळी रशियन दूतावासाचे प्रतिनिधी उपस्थित होते; अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
अलेक्सीचे मौन अचंबित करणारे
दरम्यान, अलेक्सी लिओनोव्ह याने गोव्यासहीत भारतातील अन्य राज्यांत आपल्या वास्तव्यात अनेकांचे खून केल्याचे सांगून खळबळ माजवून दिली होती. अनेकांना आपण खून करून मोक्ष दिल्याचे तो पोलिसांना सांगत होता. आपल्या आईचे नाव एलेना होते व आई आपल्याला सतावत असल्याने या नावाबद्दल द्वेष होता. त्यातूनच आपण आईच्या नावाचे साम्य असलेल्या दोन रशियन महिलांचे खून केल्याचे आणखी एक कथानक पोलिसांना सांगत पोलिसांची दिशाभूल चालवली होती. मात्र, आता संशयित अलेक्सी याने सध्या मौन बाळगले आहे. तो आता पोलिसांना काहीच माहिती देत नसल्याने पोलिसांनाही तपासात अडथळा निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.