
पणजी : गोव्यात (Goa) जिल्हा पंचायत (Zilla Panchayat) सदस्यांना नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. नव्या जबाबदारीमुळे पंचायत सदस्यांना सामाजिक क्षेत्रात मोठी भूमिका बजवावी लागणार असल्याचे पंचायत मंत्री (Panchayat Minister) मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले. गुरुवारी जीपार्डतर्फे नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्यांना आयोजित केलेल्या प्रशिक्षण (Training) शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संचालक महादेव आरोंदेकर, जीपार्ड संचालक शेट्ये व अन्य अधिकारी उपस्थित होते.
गुदिन्हो यांनी सांगितले की, जीपार्डतर्फे देण्यात येणारे प्रशिक्षण पंचायत सदस्यांना उपयुक्त ठरणार आहे. यामुळे त्यांना आपली जबाबदारी आणि कर्तव्ये यांची माहिती होईल. सामान्य जनता, अधिकारी आणि सरकार यांच्यामधील दुवा कसे बनायचे हे देखील त्यांना समजेल. सदस्यांनी आपले आणि विरोधी मतदार असा भेदभाव सोडून सर्वांसाठी काम करणे आवश्यक आहे. मतभेद बाजूला ठेवल्यास विकास कामे करणे अधिक सुलभ होईल. नवनिर्वाचित सदस्यांना सर्वतोपरी पाठिंबा देण्यास सरकार तयार आहे.
ते म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार, वित्त आयोगातर्फे जिल्हा पंचायतीसाठी निधी दिला जातो. मात्र; काही वेळेस केंद्रीय योजनांचा निधी खर्च होत नसल्याचे समोर आले आहे. यासाठी पंचायत सदस्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. त्यांनी लोकोपयोगी प्रकल्प राबवून हा निधी खर्च करावा. आवश्यक असल्यास सरकार अतिरिक्त निधी देण्यात देखील तयार आहे. याशिवाय विविध प्रकारच्या सीएसआरमधून देखील निधी गोळा करावा. देशातील अन्य जिल्हा परिषदांना भेट देऊन तेथील उपयुक्त प्रकल्प गोव्यात राबवावेत.
कचरा व्यवस्थापन योग्य हवे
मंत्री गुदिन्हो म्हणाले की, गोवा हे एक पर्यटन राज्य असल्याने स्वच्छतेवर भर देणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी आजही कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नाही. रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. जिल्हा पंचायत सदस्यांनी आपला मतदारसंघ स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.